‘बंद करा ती आघाडी!’ ओमर अब्दुल्लांचा इंडी आघाडीवर तोफगोळा

ना कुठला अजेंडा, ना कुठले नेतृत्व कशाला हवी अशी युती?

‘बंद करा ती आघाडी!’ ओमर अब्दुल्लांचा इंडी आघाडीवर तोफगोळा

जम्मू- काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी ‘इंडी’ आघाडीबाबत मोठे वक्तव्य केले आहे. ‘इंडी’ आघाडी बरखास्त करण्यासंदर्भात त्यांनी वक्तव्य केल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. दिल्ली निवडणुकीमध्ये ‘इंडी’ आघाडीचे घटक पक्ष असलेले काँग्रेस आणि आप हे आमनेसामने निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. त्यामुळे दिल्लीमध्ये भाजपा, काँग्रेस आणि आप अशी तिरंगी लढत रंगणार आहे. या दरम्यान आप आणि कॉंग्रेस यांनी एकत्र लढावं अशी इच्छा इंडी आघाडीतील काही घटक पक्षांनी केली होती.

ओमर अब्दुल्ला यांनी म्हटले आहे की, जर इंडी आघाडीची युती फक्त लोकसभा निवडणुकीपर्यंत असेल तर ती संपली पाहिजे कारण मला आठवते की ही आघाडी बनवताना कोणतीही कालमर्यादा निश्चित केलेली नव्हती. लोकसभा निवडणुकीनंतर याबाबत कोणतीही बैठक झालेली नाही. या आघाडीचा ना कुठला अजेंडा आहे ना कुठले नेतृत्व त्यामुळे त्याच्या अस्तित्वाबाबत स्पष्टता नाही. ही युती केवळ संसदीय निवडणुकीपुरती असेल तर ती संपवली पाहिजे, असं स्पष्ट मत त्यांनी मांडले आहे.

ओमर अब्दुल्ला हे दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रश्नाला उत्तर देताना म्हणाले की, “मी याबद्दल काहीही बोलू शकत नाही कारण आमचा दिल्लीच्या निवडणुकीशी काहीही संबंध नाही. आप, काँग्रेस आणि तेथील इतर पक्षांनी भाजपचा मुकाबला कसा करायचा हे ठरवले पाहिजे. माझ्या आठवणीनुसार, इंडी आघाडीसाठी कोणतीही वेळेची मर्यादा नव्हती. दुर्दैवाने, इंडी आघाडीची कोणतीही बैठक आयोजित केली जात नाही त्यामुळे नेतृत्व, अजेंडा किंवा आघाडी म्हणून आमच्या अस्तित्वाविषयी स्पष्टता नाही, त्यामुळे अशा परिस्थितीत त्यांनी ही युती संपुष्टात आणली पाहिजे.”

हे ही वाचा : 

प्रियांका वाड्रा चांगल्या, राहुल गांधी शिष्ट!

आदित्य ठाकरे म्हणाले, तर आम्हीही फडणवीसांचे कौतुक करू!

१९५४च्या कुंभमेळ्यात नेहरू आले आणि चेंगराचेंगरीत १००० लोक मेले!

विधानसभा निवडणूक ‘हातचा मळ’ समजण्याची चूक केली!

गेल्या काही आठवड्यांपासून आप आणि काँग्रेस हे दिल्ली निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकमेकांवर जोरदार निशाणा साधत आहेत. काँग्रेस नेत्यांनी अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील पक्षावर भ्रष्टाचार आणि खराब कारभाराचा आरोप केला आहे, तर आपकडून आरोप केला जात आहे की, काँग्रेस भाजपसोबत हातमिळवणी करत आहे. दरम्यान, लोकसभा निवडणुकीनंतर झालेल्या काही राज्यातील विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसला मिळालेल्या पराभवानंतर, त्यांनी इंडी आघाडीचे नेतृत्व करावे का? असे प्रश्नही उपस्थित केले गेले आहेत. तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांनी संधी दिल्यास नेतृत्व करण्याची तयारी दाखवली आहे. तर, काही घटक पक्षांनी याला पाठिंबा दिला आहे.

Exit mobile version