ओमर अब्दुल्ला पुन्हा नजरकैदेत?

ओमर अब्दुल्ला पुन्हा नजरकैदेत?

जम्मू आणि काश्मिरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष ओमर अब्दुल्ला यांनी आपल्याला घरातच बंदिस्त केले असल्याचा कांगावा ट्वीटरवरून केला. मात्र श्रीनगर पोलिसांतर्फे त्याला उत्तर देण्यात आले.

हे ही वाचा: 

काश्मीरमध्ये ३००० पंडितांना दिल्या सरकारी नोकऱ्या

घरासमोरच्या पोलिसांच्या गाडीचा फोटो ट्वीटसोबत जोडून ओमर अब्दुल्ला यांनी “हे ऑगस्ट २०१९ नंतरचे नवे जम्मू आणि काश्मिर आहे. आम्हाला कोणतेही कारण न देता आमच्या घरात बंदिस्त करण्यात आले आहे. मी आणि माझे वडिल (संसद सभासद) आम्हाला आमच्या घरात बंदी करण्यात आले आहे. माझ्या बहिणीला आणि तिच्या मुलांना देखील त्यांच्या घरात बंदी बनवण्यात आले आहे.” असे ट्वीट केले होते. त्यासोबत त्यांनी आणखी एक ट्वीट केले आहे. त्यात ते म्हणतात “चला, तुमच्या लोकशाहीच्या नव्या मॉडेलनुसार आम्हाला कोणतेही कारण न देता घरात बंदी केलं आहेच, त्यावर कडी म्हणून घरी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना देखील तुम्ही आत सोडत नाही, आणि मी अजून संतप्त असल्याबद्दल तुम्हाला आश्चर्य वाटते”

त्याला उत्तरादाखल श्रीनगर पोलिसांनी देखील ट्वीट केले आहे. त्यात पोलिसांनी स्पष्टीकरण दिले आहे की, “आज लेथपोराच्या दहशतवादी हल्ल्याला दोन वर्षे पुर्ण झाली आहेत, त्यामुळे सुरक्षा वाढवण्यात आली आहे. काही अनिष्ट घडण्याच्या शक्यतेमुळे  सर्व व्हीआयपी व्यक्तींच्या हालचालींवर निर्बंध घालण्यात आले आहेत शिवाय आज कोणत्याही प्रकारचा प्रवास टाळण्याचे देखील सुचवण्यात आले आहे.”

मात्र तरीही त्यावर ओमर अब्दुल्लांनी ते अकाऊंट जम्मू आणि काश्मिर पोलिसांचे आहे का यावर शंका उपस्थित केली. कारण अकाऊंट निश्चित करणारी निळ्या रंगाची खूण त्या अकाऊंटसमोर नाही.

Exit mobile version