भारतीय जनता पक्षाच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा यांना आपल्या बचावार्थ शस्त्रपरवाना मिळाला आहे. नुपूर शर्मा यांना इस्लामी कट्टरतावाद्यांकडून ठार मारण्याच्या धमक्या आल्या आहेत, येत आहेत. २६ मे २०२२ला एका वाहिनीवर बोलताना त्यांनी मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल कथित आक्षेपार्ह टिप्पणी केल्यानंतर त्यांना या धमक्या येऊ लागल्या.
अनेक राज्यात नुपूर शर्मा यांच्याविरोधात तक्रारी करण्यात आल्या असून काही लोकांची याच प्रकरणात सर तन से जुदा अशा घोषणा देत हत्याही करण्यात आल्या आहेत.
नुपूर शर्मा यांनी या धमक्यांमुळे शस्त्रास्त्र परवान्यासाठी अर्ज केला होता, अशी माहिती दिल्ली पोलिसांनी दिली आहे. त्यानुसार त्यांना परवाना देण्यात आला आहे. त्यामुळे त्या आता सोबत पिस्तुल बाळगू शकणार आहेत.
मे २०२२मध्ये नुपूर शर्मा यांनी केलेल्या या वक्तव्याची दोन दिवस कोणतीही चर्चा नव्हती मात्र नंतर त्यांचे ते वक्तव्य वेगळे काढून त्यावरून शर्मा यांना लक्ष्य करण्यात येऊ लागले. नंतर भाजपाने त्यांना प्रवक्तेपदावरून काढले. नुपूर शर्मा यांना समर्थन दिल्याबद्दल राजस्थानात कन्हैय्यालाल नावाच्या एका गरीब टेलरचा गळा चिरून इस्लामी कट्टरतावाद्यांनी हत्या केली होती. महाराष्ट्रात उमेश कोल्हे यांची अशीच हत्या झाली.
अनेक मुस्लिम देशांनीही नुपूर शर्माविरोधात निवेदने काढून धमक्या दिल्या. नुपूर शर्मा यांनी या सगळ्या घटनाक्रमानंतर माफी मागितली. त्यांच्याविरोधात आठ राज्यांत १० तक्रारी पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आल्या आहेत. पण सर्वोच्च न्यायालयाने या सगळ्या तक्रारी दिल्लीत एकत्रित करण्याचे आदेश दिले.
नुपूर शर्मा यांनी हे वक्तव्य केले, ते त्याच चर्चेत तस्लीम अहमद रहमानी यांच्या विधानानंतर. रहमानी यांनी वारंवार शिवलिंगाबाबत आक्षेपार्ह टिप्पणी केली त्यानंतर नुपूर शर्मांनी त्यांना प्रत्युत्तर देताना मोहम्मद पैगंबरांचा संदर्भ दिला होता.