महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या युरोप दौऱ्यावरून टीका करणारे आदित्य ठाकरे यांचा आता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या परदेश दौऱ्यावरून जळफळाट झाला असून त्यांनी आमदार अपात्रतेच्या मुद्द्यावर निर्णय देण्याआधी परदेश दौऱ्याला जाऊ नये, असा अनाहूत सल्लाही दिला आहे.
एकनाथ शिंदे हे ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात युरोप दौऱ्यावर जाणार होते पण त्यांनी या दौऱ्याचा कार्यक्रम जाहीर करावा असा आक्षेप आदित्य ठाकरे यांनी घेतला. दरम्यान, हा दौरा पुढे ढकलण्यात आल्यानंतर आपण प्रश्न उपस्थित केल्यामुळेच एकनाथ शिंदे यांचा दौरा रद्द झाल्याचा मजेशीर दावा आदित्य ठाकरे यांनी ट्विट करून केला होता.
आता तसाच आक्षेप त्यांनी राहुल नार्वेकर यांच्या घाना दौऱ्यावर केला आहे. राष्ट्रकुल संसदीय परिषदेला राहुल नार्वेकर जात आहेत. पण आदित्य ठाकरे यांनी त्यावर आक्षेप नोंदविला आहे. त्यांनी भलामोठा मेसेज करत नार्वेकर यांना सवाल उपस्थित केला आहे. तसेच त्यांच्या या दौऱ्यामुळे जागतिक स्तरावर देशाची बदनामी होत असल्याचे सांगत भारतात लोकशाहीच शिल्लक राहिली नसल्याचे म्हटले आहे.
राहुल नार्वेकर यांच्यासमोर आता आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा सुनावणीसाठी आलेला आहे. पण आता ती सुनावणी १३ ऑक्टोबरला घेण्यात आली आहे. त्यामुळे ठाकरे गटात अस्वस्थता आहे. त्यावरून राहुल नार्वेकर यांनी या दौऱ्याला जाऊ नये असे मत आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केले आहे.
हे ही वाचा:
जमीन गहाण टाकून ७५ लाखांच्या घोड्याची खरेदी; सुवर्णपदक विजेत्या घोडेस्वारांची कमाल!
सन २०२४ आणि २०२९मध्ये ‘एक देश, एक निवडणूक’वर उमटू शकते मोहोर!
नगरसेवकांचा सहानुभूतीवर भरोसा नाय काय?
फरार उद्योगपती नीरव मोदीची उंदीर-घुशींपासून सुटका!
राहुल नार्वेकर यांच्यावर याआधी संजय राऊत, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनीही टीका केलेली आहे. दानवे यांनी न्यायाला उशीर करणे म्हणजे अन्याय करणे असे म्हटले होते. आदित्य ठाकरे यांनीही आता त्याचीच री ओढली आहे. आपल्या ट्विटमध्ये त्यांनी न्यायाला उशीर करणे म्हणजे अन्याय करणे आहे पण तो फक्त आमच्यावर नाही तर महाराष्ट्रावर आहे, असे म्हटले आहे.
आदित्य ठाकरे यांनी मविआचे सरकार कपटाने पाडण्यात आल्याचे म्हटले असून सभापती राहुल नार्वेकर जाणीवपूर्वक विलंब करत आहेत. हे करून ते घटनाबाह्य सरकारचे संरक्षण करत असल्याचा आरोपही आदित्य ठाकरे करतात.
आदित्य ठाकरे यांनी राहुल नार्वेकर यांना सल्ला दिला आहे की, आमदार अपात्रतेच्या मुद्द्यावर सुनावणी पूर्ण होण्याआधी त्यांनी परदेश दौऱ्यावर जाणे अयोग्य आहे. महाराष्ट्र पाहात आहे, भारत पाहात आहे, जग पाहात आहे, असा इशाराही त्यांनी दिला आहे.