काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. कर्नाटक निवडणूक प्रचारादरम्यान ‘बजरंग दल’ संघटनेला देशद्रोही म्हटल्या प्रकरणी मल्लिकार्जुन खर्गे यांच्या विरोधात मानहानीचे प्रकरण दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी पंजाबच्या संगरूर न्यायालयाने १०० कोटी रुपयांच्या मानहानी प्रकरणी सोमवारी त्यांना समन्स बजावले आहे.
पंजाबच्या संगरूर दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ विभाग) रमणदीप कौर यांच्या न्यायालयाने खर्गे यांना १० जुलै २०२३ रोजी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. हिंदू सुरक्षा परिषद आणि बजरंग दल हिंदचे संस्थापक हितेश भारद्वाज यांच्या याचिकेवर न्यायालयाने हा आदेश दिला आहे.
न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत हितेश भारद्वाज यांनी म्हटले आहे की, कर्नाटक विधानसभा निवडणुकीदरम्यान मल्लिकार्जुन खर्गे यांनी बजरंग दलाची तुलना देशविरोधी शक्तींशी केली होती. हितेश यांच्या म्हणण्यानुसार, खर्गे म्हणाले होते की, ‘जेव्हा-जेव्हा काँग्रेसचे सरकार येते तेव्हा बजरंग दल आणि इतर देशद्रोही संघटना समाजात द्वेष पसरवतात.’
भारद्वाज म्हणाले की, ‘जेव्हा मी पाहिले की जाहीरनाम्याच्या पान क्रमांक १० वर, काँग्रेसने बजरंग दलाची तुलना देशविरोधी संघटनांशी केली आणि निवडणूक जिंकल्यास त्यावर बंदी घालण्याचे आश्वासन दिले. यानंतर न्यायालयात धाव घेतली. कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने २ मे रोजी आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला होता. यामध्ये पीएफआय आणि बजरंग दल या संघटनांवर बंदी घालण्याचे आश्वासन देण्यात आले होते. काँग्रेसच्या आश्वासनाबाबत बजरंग दलाने देशभरात निदर्शने केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही अलीकडेच सभा आणि रॅलींमध्ये या मुद्द्याचा उल्लेख केला होता.
हे ही वाचा:
चोराला झाला पश्चात्ताप; तब्बल नऊ वर्षांपूर्वी चोरलेले दागिने केले परत
अन्य धर्मीयांचा त्र्यंबकेश्वर मंदिर प्रवेश गंभीर, एसआयटी नेमणार
उमेदवार मृत्यूमुखी पडली, पण मतदारांनी निवडून आणले
उत्तराखंडमध्ये ३०० हून अधिक बेकायदा मझार जमीनदोस्त
कर्नाटक विधानसभा निवडणुकीत बजरंग बलीचा मुद्दा चर्चेत आला होता. काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्यात बजरंग दलावर बंदी घालण्याचे आश्वासन दिले आहे. बजरंग दलाची बदनामी केल्याने हे प्रकरण न्यायालयात पोहोचले. विश्व हिंदू परिषदेच्या चंदीगड युनिटने काँग्रेस अध्यक्ष खर्गे यांना कायदेशीर नोटीस पाठवून मानहानीसाठी १०० कोटी रुपये भरण्यास सांगितले होते.