भाजपा नेते अतुल भातखळकर यांचा घणाघात
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांची इन्स्टाग्रामवर बदनामी केल्यानंतर त्यावर सडकून टीका होऊ लागली आहे. भाजपा नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर नव्हे तर पंडित नेहरूच खरे माफीवीर होते, अशा शब्दांत राहुल गांधी आणि काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे.
आपल्या व्हीडिओत आमदार भातखळकर यांनी म्हटले आहे की, उल्लुमशाल राहुल गांधीना आणि काँग्रेसच्या बगलबच्च्यांना मी इतिहासाचे थोडे ज्ञान देऊ इच्छितो. राहुल गांधी यांचा वाचनाशी काही संबंध नाही. कारण ‘काळे पाणी’ हे सावरकरांनी अंदमानमध्ये भोगलेल्या यातनांवरील पुस्तक येऊन कित्येक वर्षे झाली. विक्रम संपत यांनी आठ वर्षे अध्ययन करून सावरकरांवर दोन ग्रंथ प्रसिद्ध केले. पण वाचन, विचार यांचा राहुल गांधी यांच्य़ाशी आणि त्यांच्या बगलबच्च्यांशी काही संबंध नाही.
भातखळकर म्हणतात की, माफी सावरकरांनी मागितली नाही, तर खरे माफीवीर हे पंडित जवाहरलाल नेहरू होते. १९२३ साल सावरकर अंदमानच्या कोठडीत होते. सात वर्षे कोलू फिरवत होते. अंदमानच्या कोठडीत आपण गेलो तर डोळ्यांतून घळाघळा पाणी येईल इतकी भयंकर परिस्थिती तिथल्या क्रांतिकारकांची होती. त्या तुरुंगातून फक्त अंदमानमधील क्रांतिकारकांना देण्यात येणाऱ्या फाशीची जागा दिसते. सावरकरांना जे बाहेरच्या जगाचे दर्शन घडत होते ते फक्त एवढेच. विविध रोग त्यांना झाले. याच १९२३ साली आणखी काय घडले? तर भारताचे लाडके पंतप्रधान नेहरू हे पंजाबमधील नाभा नावाच्या एका संस्थानाच्या स्वातंत्र्याच्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी गेले. ते गेल्यानंतर तिथल्या पोलिसांनी त्यांना अटक केली आणि तुरुंगात टाकले. पंडित नेहरू म्हणाले होते की, हा काय तुरुंग आहे का? इथल्या भिंती पडक्या आहेत, मातीच्या आहेत. इथे डास आहेत, ढेकूण आहेत. हे मला सहन होत नाही. मी यापूर्वी ज्या तुरुंगात होतो, तिथे मला हवं ते खायला मिळायचं, खेळायला मिळायचं. इथे काहीच नाही. मग त्यांचे पिताश्री मोतीलाल नेहरू कळवळून उठले. त्यांनी थेट तत्कालिन व्हाइसरॉय यांच्याकडे याचना केली. माझा मुलगा उच्च विद्याविभुषित आहे. तुम्ही सांगाल त्या अटी आम्हाला मान्य आहेत, पण जवाहरला सोडा. मग व्हाइसरॉयने मध्यस्थी केली. जवाहरलाल यांनी माफीची याचना केली, बॉण्ड लिहून दिला. मग दोन आठवड्याच्या आत या तथाकथित तुरुंगातून काढले गेले आणि मग ते आपल्या घरी खुशाल गेले. नेहरूंच्या सोबत आणखी दोन सहकारी होते. त्यांचे काय झाले. जे नरसिंहरावांच्या बाबत झाले तेच या सहकाऱ्यांचे झाले. ते राहिले तुरुंगात आणि नेहरू आपल्या घरी. माझे काँग्रेसच्या लोकांना सांगणे आहे की, राहुल गांधींच्या मूर्खपणापायी लाचारी आणि बेशरमपणे वागता.
आमदार भातखळकर यांनी काँग्रेसवर घणाघात करताना म्हटले की, तुम्ही सावरकरांच्या आणि नेहरूंच्या तुरुंगाची तुलना करता? सावरकर ज्या अंदमान तुरुंगात होते तिथले हवामान काय होते, खाण्याची काय व्यवस्था होती. सावरकरांच्या बरोबर अनेक क्रांतिकारक तिथे होते. पण त्या परिस्थितीतही सावरकर यांनी क्रांतिकारकांची संघटना उभी केली. त्यांच्यावर अन्याय दूर व्हावेत असे प्रयत्न केले. एक आणि दोन पत्र सावरकरांनी लिहिली म्हणून त्यांना माफीवीर म्हणता? माफी खरे तर, पंडित नेहरूंनी मागितली. ते सुद्धा एका घराला जेल म्हणत डांबलेलं असताना. कोलू फिरवायला लागला असता तर नेहरूंनी ब्रिटनचे नागरिकत्व पत्करले असते. पंडित नेहरू नगरच्या जेलमध्ये असताना तिथले जे जेलर होते त्यांची डायरी त्यांच्या चिरंजीवांना सापडली. महाराष्ट्र टाइम्सच्या दिवाळी अंकात या डायरीच्या आधारावर लेख लिहिला. काय वर्णन आहे त्यात. ते ऐकल्यावर आम्हालाही असा तुरुंग द्या असे वाटेल.
स्वातंत्र्यवीर सावरकर नव्हे,
नेहरू होते माफीवीर…https://t.co/MumOYosN81— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) September 16, 2021
त्यात म्हटले होते की, रोज संध्याकाळी नेहरू बॅडमिंटन खेळत, त्यांना खाद्यपदार्थ साध्या भांड्यातून देऊ नका. चिनी भांडी, चांदीची भांडी अशा भांड्यातून तुरुंगातील नेहरुंना अन्नधान्य दिलं पाहिजे, अशा सूचना होत्या. त्यांचे आचारी वेगळे, धान्य वेगळे. मग जेलरसाबेबांनी नोंद केली आहे की, पं. नेहरू किती मनाने विशाल. त्यांनी लिहिले की एक दिवस माझ्या लक्षात आले की तुरुंगातला ५५५ ब्रँडच्या सिगारेटचा साठा संपला आहे. आता नेहरू ही सिगारेट मागतील आणि आपण नाही म्हटल्यावर ते चिडतील. पण मी नेहरूंना ही गोष्ट सांगितल्यावर ते रागावले नाहीत, त्यांनी मला क्षमा केली. केवढे ते औदार्य. सावरकरांनी याच अंदमानात १० हजार काव्यपंक्ती रचल्या. हात-पाय साखळदंडाने बांधलेले होते. तेव्हाही त्यांना मातृभूमीच्या कविता सावरकरांना स्फुरायच्या. त्या कविता बेड्यांनी भिंतीवर कोरायचे. ते पाठ करायचे. कधी बाहेर येईन त्यावेळी ही कविता प्रसिद्ध करीन, असे ते म्हणत. या अंदमानच्या जेलमध्ये आपण मृत्युमुखी पडलो आणि आपल्या मृतदेहाला इथेच टाकून देण्यात आले तरी स्वातंत्र्यानंतर आपली हाडे आनंदाने नाचू लागतील, असे काव्य सावरकरांनी लिहिले. आणि अशा तुरुंगांची तुम्ही तुलना करता.
हे ही वाचा:
फ्रान्सने आयएसआयएस प्रमुखाला संपवले
अभिनेत्याच्या जाचाला कंटाळून शरीरसौष्ठवपटू मनोज पाटीलची आत्महत्या
पंतप्रधान मोदी म्हणतात, उत्तर प्रदेशातील गुंडगिरीचा योगींनी अंत केला!
तब्बल १४ वर्षांनंतर त्याच्या शिक्षेत केली वाढ! काय घडले वाचा…
भातखळकर म्हणाले, राहुल गांधी यांचा लायकी नाही आणि बौद्धिक कुवतही नाही, इतके सावरकर महान होते. त्यामुळे यापुढे जर सावरकरांचा अपमान केला तर तुमच्या घराण्याचा सगळा इतिहास बाहेर काढायला मागे पुढे पाहणार नाही. सावरकर हिंदुत्ववादी आहेत. त्यांचे विचार हे काळाच्या पाठीवर खरे ठरत आहेत. म्हणून राजकीय द्वेषातून तुम्ही हे बोलत आहात. तुम्ही एक खोटं बोललात तर आम्ही १०० सत्य समोर आणू. एवढंच या उल्लुमशाल राहुल गांधी आणि काँग्रेसमधील त्यांच्या बगलबच्च्यांना सांगू इच्छितो, अशा शब्दांत आमदार भातखळकर यांनी काँग्रेसला इशारा दिला आहे.