माहीममध्ये रंगणार तिरंगी लढत; अमित ठाकरेंनी भरला उमेदवारी अर्ज

राज ठाकरेंसह मनसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित

माहीममध्ये रंगणार तिरंगी लढत; अमित ठाकरेंनी भरला उमेदवारी अर्ज

राज्यात विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असून पक्षांकडून उमेदवारांच्या नावांची घोषणा केली जात आहे. अशातच मुंबईमधील माहीम विधानसभा क्षेत्रातून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपूत्र अमित ठाकरे रिंगणात आहेत. त्यांच्यासमोर शिवसेनेचे सदा सरवणकर आणि ठाकरे गटाचे महेश सावंत हे ही निवडणुकीच्या रिंगणात आहेत. अशातच अमित ठाकरे यांनी सोमवार, २८ ऑक्टोबर रोजी विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल केला.

अमित ठाकरे यांचे अर्ज भरण्यापूर्वी घरी औक्षण करण्यात आले यानंतर त्यांनी शिवाजी पार्कच्या उद्यान गणेश मंदिरात जाऊन गणपती बाप्पांच दर्शन घेतलं. यानंतर स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतिस्थळाला जाऊन अभिवादन केलं. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर, प्रबोधनकार ठाकरे यांना देखील अमित ठाकरेंनी अभिवादन केलं. त्यानंतर अमित ठाकरेंनी पत्नीसह सिद्धविनायक मंदीरात जाऊन दर्शन घेतले. नंतर उमेदवारी अर्ज दाखल केला. मुलाचा उमेदवारी अर्ज दाखल करताना स्वत: राज ठाकरे तिथे उपस्थित होते. शिवाय मोठ्या संख्येने मनसे कार्यकर्ते आले होते.

उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर अमित ठाकरे यांनी मीडियाशी संवाद साधला. “माझा उमेदवारी अर्ज भरताना बरेच लोक आले होते. या माहीममध्ये मी लहानाचा मोठा झालो. अनेकांना मी काका बोलतो, ते सर्व हजर होते, मला बरं वाटलं. मी माझं काम प्रामाणिकपणे करत राहणार. माझं व्हिजन घेऊन लोकांपर्यंत जाणार. २३ तारखेला लोक काय कौल देतात? ते समजेल,” असं अमित ठाकरे म्हणाले.

हे ही वाचा :

भारताच्या चिराग चिक्काराची सुवर्णझेप, ठरला दुसरा कुस्तीपटू!

संजय राऊत, नाना पटोलेंमध्ये जुंपली; राऊत म्हणतात, यादीत काँग्रेसची टायपिंग मिस्टेक

रशिया- युक्रेनमधील युद्धावर नरेंद्र मोदी तोडगा काढू शकतील

जम्मू-काश्मीरमधील अखनूरमध्ये पुन्हा एकदा लष्कराच्या वाहनावर गोळीबार

यादरम्यान मनसेप्रमुख राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे पहिल्यांदाच निवडणुकीच्या मैदानात उतरल्याने माहीमविधानसभेकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. माहीममध्ये मनसेकडून अमित ठाकरे, शिवसेना शिंदे गटाकडून सदा सरवणकर आणि शिवसेना ठाकरे गटाकडून महेश सावंत यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे माहीममध्ये तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे.

Exit mobile version