मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला निर्णय
मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी कारभाराला धडाक्यात प्रारंभ केला असून आषाढी एकादशीसाठी जाणाऱ्यांना टोलमाफी देण्याचे आदेश दिले आहेत. त्यांनी आषाढीसाठी सर्व व्यवस्था चोख असली पाहिजे असे आदेश दिले असून वाहतूक व्यवस्था उत्तम असावी, खड्डे नकोत असे अधिकाऱ्यांना सांगितले आहे.
आषाढी एकादशीसंदर्भात मुख्यमंत्र्यांनी आढावा बैठक घेतली. या बैठकीत पुण्याचे विभागीय आयुक्त, सोलापूरचे आयुक्त, पंढरपूरचे पोलिस अधिकारी, मुख्य सचिव यांचा समावेश होता. गणपतीच्या दिवसात जशी टोलमाफी देण्यात येते तशीच ती आषाढीसाठीही देण्याच यावी असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.
कोरोनामुळे पंढरपूरला गेली दोन वर्षे लोक मोठ्या संख्येने दर्शनासाठी जाऊ शकले नव्हते. पंढरपूर वारीवरही मर्यादा होत्या. गेल्यावर्षी तत्कालिन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वतः गाडी चालवत गेले होते, पण वारकऱ्यांना मात्र परवानगी मिळाली नव्हती. मात्र यावेळी मोठी गर्दी होण्याची शक्यता असल्यामुळे सगळे योग्य नियोजन करण्यास मुख्यमंत्र्यांनी बजावले आहे. साफसफाई, स्वच्छतागृहे, रस्ते सफाई, औषधे, पिण्याचे पाणी, यांची योग्य व्यवस्था असली पाहिजे असे आदेश त्यांनी दिले आहेत.
हे ही वाचा:
“एकनाथ शिंदेंना भेटायला जाण्यासाठी देवेंद्रजी वेशांतर करून जायचे”
अग्निपथ योजनेंतर्गत हवाई दलाला सात लाखाहून अधिक अर्ज
मुख्तार अब्बास नक्वी उपराष्ट्रपतीपदाच्या शर्यतीत?
आमदारांच्या उठावाला संजय राऊतचं जबाबदार
परिवहन प्रधान सचिवांनाही सूचना करण्यात आल्या असून एसटी बसेसचीही पूर्ण सोय करण्याचे सांगण्यात आले आहे. ४७०० एसटी बसेस यासाठी सज्ज ठेवण्यात येणार आहेत. मुख्य म्हणजे यावेळी एकनाथ शिंदे हे विठ्ठल दर्शनाला सपत्निक जाणार आहेत. आपल्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला विठ्ठलाच्या पूजेचा मान मिळणार ही भाग्याची गोष्ट असल्याचे त्यांनी म्हटले आहे.