राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडलेली नाही, असा दावा शरद पवार आणि त्यांची कन्या तसेच खासदार सुप्रिया सुळे यांनी केल्यानंतर आता अजित पवार यांना पक्षाचे दरवाजे बंद झाल्याचे शरद पवारांनी म्हटले आहे. त्यामुळे आता संघर्ष वाढणार की, केवळ बोलाचीच कढी ठरणार याबाबत चर्चा रंगू लागली आहे.
एकीकडे सुप्रिया सुळे यांनी अजित पवार हे आमचेच नेते आहेत, आमदार आहेत असे विधान केले होते. पण शरद पवार यांनी ते आमचे नेते आहेत असे मी कुठेच म्हटलेले नाही, असे म्हणत अजित पवारांपासून चार हात लांब असल्याचे संकेत दिले. पत्रकार परिषदेत बोलताना शरद पवार म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अजित पवारांना पुन्हा संधी देणार नाही, हे त्यांनी स्पष्ट केले. साताऱ्यात ते पत्रकारांशी बोलत होते.
हे ही वाचा:
तेलंगणाची ‘सूरही’ ते नागालँडची ‘शाल’, ब्रिक्स परिषदेतील नेत्यांना मोदींकडून भेट !
भारतात होणाऱ्या G२० परिषदेला व्लादिमीर पुतीन अनुपस्थित ?
पुतिन यांनी वाहिली श्रद्धांजली म्हणजे प्रिगोझिन यांचा मृत्यू झाला हे नक्की!
नीरज चोप्राचा ‘पॅरिसस्पर्श’; जागतिक स्पर्धेतून ऑलिम्पिकसाठी पात्र
बारामतीमध्ये शरद पवार यांनी अजित पवार हे आमचे नेते असल्याचे वक्तव्य केल्याचा मुद्दा उपस्थित करताच आपण असे बोललो नव्हतो असे पवार म्हणाले. पण अजित पवारांना पक्षात पुन्हा संधी नाही, हे सांगायला ते विसरले नाहीत. ते म्हणाले की, एक दिवशी दोन व्यक्तींचा पहाटे शपथविधी झाला होता. त्यात आमचे एक सदस्य होते. मात्र त्या सदस्याने नंतर आपण अशी चूक करणार नाही, आपण त्या रस्त्याने जाणार नाही, अशी भूमिका घेतल्याने आम्ही एक संधी दिली. पण एकदा असे केल्यानंतर पुन्हा संधी मागायची नसते आणि ती मागितली तरी द्यायची नसते.
तिकडे सुप्रिया सुळे मात्र अजित पवार हे आमचे नेते आहेत असे म्हणत असल्यामुळे त्याबद्दल शरद पवारांना विचारल्यावर ते म्हणाले की, अजित पवार आणि सुप्रिया यांच्यात बहीण भावाचे नाते आहे त्यामुळे त्याचा राजकीय अर्थ काढू नये. पण आज ज्यांनी आमच्याविरोधात भूमिका घेतली आहे ते आमचे नेते नाहीत. शरद पवारांच्या या वक्तव्यामुळे अजित पवारांना राष्ट्रवादीत परतण्याचे सर्व दरवाजे बंद झालेत असे मानले जाते.
मात्र एकीकडे साताऱ्यात शरद पवार गेलेले असताना अजित पवार पिंपरी चिंचवडमध्ये पक्षाचे चिन्ह, नाव आपल्याकडे आहे, असे म्हणाले आणि पुढे त्यांनी सांगितले की, येत्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत आपण महायुतीतून लढणार आहोत. त्यामुळे त्यादृष्टीने आपल्याला तयारी करायची आहे.
पण अजित पवारांनी शरद पवारांच्या वक्तव्याबाबत मात्र पत्रकारांशी बोलताना काहीही बोलण्याचे टाळले. त्यामुळे अजित पवारांना पुन्हा संधी मिळणार नाही, या शरद पवारांच्या इशाऱ्याचे उत्तर अजित पवारांकडून मिळू शकलेले नाही.