दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठाने (जेएनयू) त्यांचे नियम कठोर केले आहेत. या नियमांतर्गत शैक्षणिक इमारतीच्या १०० मीटर अंतराच्या परिसरातील भिंतीवर पोस्टर लावण्यास, आंदोलन करण्यास बंदी घालण्यात आली आहे. या नियमांचे उल्लंघन केल्यास विद्यार्थ्याला २० हजार रुपयांपर्यंतचा दंड आकारला जाऊ शकतो किंवा त्याची हकालपट्टी केली जाऊ शकते. याआधी प्रशासकीय इमारतीच्या १०० मीटर परिसरात आंदोलन करण्यास बंदी होती.
ऑक्टोबरमध्ये एका इमारतीच्या भिंतीवर देशविरोधी घोषणा लिहिण्यात आल्या होत्या. या पार्श्वभूमीवर विद्यापीठ प्रशासनाने हे पाऊल उचलले आहे. जेएनयू विद्यार्थी संघटनेने या नियमांना विरोध केला असून, ही कठोर नियमावली म्हणजे कॅम्पस संस्कृतीला गळचेपी करण्याचा प्रयत्न म्हटले आहे. याबाबत विद्यापीठ प्रशासनाशी संपर्क साधला असता, त्यांनी प्रतिसाद दिला नाही.
हे ही वाचा:
काँग्रेस पक्ष देशात असताना ‘मनी हाईस्ट’ या काल्पनिक कथानकाची गरज आहे का?
बेंगळुरूच्या डॉक्टरांनी तब्बल १८ वर्षानंतर माणसाच्या डोक्यात अडकलेली गोळी काढली बाहेर!
निवडणूक आयोगाने तेलंगणाचे पोलीस महासंचालक अंजनी कुमार यांचे निलंबन घेतले मागे!
रुग्णालयाच्या शौचालयात फेकले बाळाला!
एक्झिक्युटिव्ह कौन्सिलने मंजूर केलेल्या या नियमावलीनुसार, कुलगुरू किंवा सक्षम प्राधिकाऱ्यांना एखादे कृत्य अपमानास्पद, देशविरोधी किंवा विघटनकारी ठरवण्याचा अधिकार प्रदान करण्यात आला आहे. अशा कृत्यांसाठी दंड आकारला जातो आणि वारंवार ही शिक्षा भोगावी लागल्यास विद्यार्थ्यांची विद्यापीठातून हकालपट्टीही केली जाऊ शकते. मात्र अशा प्रकरणात विद्यार्थ्यांवर खोटे आरोपही केले जाऊ शकतात, अशी भीती व्यक्त केली जात आहे. चौकशीदरम्यान विद्यार्थ्याच्या उलटतपासणीलाही परवानगी नाही आणि कुलगुरूंचा निर्णय अंतिम मानला जातो.