शिवतीर्थावर म्हणजेच शिवाजी पार्क मैदानात दसरा मेळावा घेण्यासाठी शिवसेना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबई महापालिकेकडे अर्ज दाखल केला होता. आज याप्रकरणी सुनावणी होणार आहे. दरम्यान, याआधीच मुंबई महापालिकेने दसरा मेळाव्याची परवानगी नाकारली आहे. त्यामुळे शिवाजी पार्क दसरा मेळाव्याला कुणालाच परवानगी मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. महापालिकेकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांना परवानगी नाकारल्याचे पत्र पाठवण्यात आले आहे.
शांतता आणि सुव्यवस्थेच्या प्रश्नावरुन परवानगी नाकारली असल्याचे मुंबई महापालिकेकडून सांगण्यात आले आहे. मुंबई पालिकेने पत्रात म्हटले आहे की, छत्रपती श्री शिवाजी महाराज पार्क, दादर येथे दसरा मेळावा आयोजित करण्याकरिता परवानगी मिळावी म्हणून आपला विनंती अर्ज या कार्यालयात प्राप्त झाला आहे. तसेच मा.खा.अनिल देसाई यांचे सुध्दा छत्रपती श्री. शिवाजी महाराज पार्क, दादर येथे दसरा मेळावा आयोजित करण्याकरिता अर्ज कार्यालयात प्राप्त झालेले आहेत.
प्राप्त अधिकारांच्या अनुषंगाने एखाद्या मैदानाच्या सार्वजनिक वापरास परवानगी देणे पुर्वी पोलीस विभागाचे अभिप्राय कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने आवश्यक आहेत. त्या अनुषंगाने वरिष्ठ पोलीस निरिक्षक, शिवाजी पार्क पोलीस ठाणे, मुंबई यांचे क्र. जा.क्र. ६४३८/२०२२ दि.२१.०९.२०२२ नुसार पोलीस विभागाचे अभिप्राय प्राप्त झालेले असून त्यात खालील प्रमाणे नमूद केलेले आहे.
दोन्ही परस्पर विरोधी अर्जदारांनी छत्रपती श्री शिवाजी महाराज पार्क मैदानात दसरा मेळावा आयोजित करण्यास परवानगी मिळण्यासाठी अर्ज केले आहेत. मात्र, कोणत्याही एका अर्जदारास दसरा मेळावा आयोजित करण्यास परवानगी दिल्यास त्यामधून शिवाजीपार्कच्या संवेदनशील परीसरामध्ये कायदा व सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्याअनुषंगाने कायदा व सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न उद्भवण्याची शक्यता असल्याने मला उप आयुक्त, (परि.-2) या पदावरील प्राप्त अधिकारांचा वापर करुन ५ ऑक्टोबर रोजी दसरा मेळावा साजरा करण्याकरिता प्राप्त झालेला आपला अर्ज नामंजुर करण्यात येत आहे.
हे ही वाचा:
एनआयए आणि ईडीची दहा राज्यांमध्ये पीएफआयवर कारवाई, शंभरहून अधिक अटक
तीस्ताला नरेंद्र मोदींची राजकीय कारकीर्द संपवायची होती
तुम्हाला बापाचा पक्ष विकणारी टोळी म्हटले तर चालेल का?
दसरा मेळाव्याला कुणालाही परवानगी नाही?
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दसरा मेळाव्यासाठी बीकेसी मैदानाची परवानगी देण्यात आली आहे. बीकेसीच्या एमएमआरडीएच्या मैदानावर मेळावा घेण्यास त्यांचा अर्ज स्वीकारण्यात आला आहे. मात्र बीकेसीतील दुसऱ्या मैदानात उद्धव ठाकरे यांच्याकडून दाखल करण्यात आलेला अर्ज फेटाळून लावण्यात आल्याची माहिती आहे.