पाकिस्तानमधील राजकीय परिस्थिती सध्या डगमगलेल्या स्थितीत आहे. दरम्यान, पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने गुरुवार, ७ एप्रिल रोजी पंतप्रधान इम्रान खान यांना मोठा दणका दिला आहे. पाकिस्तानची संसद पूर्ववत झाली असून ९ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता अविश्वास ठरावावर मतदान होणार आहे.
काही दिवसांपूर्वी इम्रान खान यांच्या विरोधातील अविश्वास ठराव फेटाळण्यात आला होता आणि संसद बरखास्त करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने निकाल देताना उपसभापती कासिम सूरी यांचा निर्णय घटनाबाह्य असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे या निर्णयामुळे इम्रान खान यांच्या अडचणी वाढल्याचे चित्र आहे.
अविश्वास प्रस्ताव फेटाळण्याच्या आणि संसद बरखास्त करण्याच्या उपसभापतींच्या निर्णयावर सुनावणी करताना पाकिस्तान सर्वोच्च न्यायालयाने आपला निर्णय राखून ठेवला होता. उपसभापती कासिम सूरी यांनी इम्रान सरकारविरोधातील अविश्वास प्रस्तावावर मतदानादरम्यान दिलेला निर्णय चुकीचा होता. तसेच, यामुळे कलम ९५ चे उल्लंघन होत असल्याचे पाकिस्तानचे सरन्यायाधीश उमर अता बांदियाल म्हणाले.
हे ही वाचा:
यशवंत जाधवांच्या ४१ मालमत्ता आयकर विभागाकडून जप्त
ईडीची कारवाई झालेल्या संजय राऊतांचं शिवसैनिकांकडून जंगी स्वागत
विकृतीने ओलांडल्या मर्यादा! घोरपडीवर बलात्कार केल्याप्रकरणी तरुण अटकेत
यशवंत जाधवांच्या डायरीत ‘मातोश्री’नंतर आता केबलमॅन, M-TAI
अविश्वास प्रस्तावावर ९ एप्रिलला मतदान होणार असून नव्याने निवडणुका घेण्याचा निर्णय रद्द करण्यात आला आहे. सरकार वाचवण्यासाठी इम्रान खान यांना ३४२ सदस्यांच्या संसदेत १७२ मतांची गरज आहे. मात्र, इम्रान खान यांनी बहुमत गमावले असून अविश्वास प्रस्ताव मंजूर होणे ही औपचारिकता असल्याची माहिती आहे.