बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी मंगळवार, ७ नोव्हेंबर रोजी महिलांच्या संदर्भात आक्षेपार्ह विधान केले होते. त्यानंतर नितीश कुमार यांच्यावर देशभरातून टीकेची झोड उठली होती. त्यांनी केलेल्या विधानानंतर त्यांनी माफी मागावी अशी मागणी केली जात होती. त्यानंतर बुधवार, ८ नोव्हेंबर रोजी नितीश कुमार यांनी विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहात हात जोडून माफी मागितली.
महिलांबद्दल वक्तव्य केल्यानंतर नितीश कुमार यांनी माफी मागितली आहे. ते म्हणाले की, “मी तर केवळ स्त्री शिक्षणाबद्दल बोललो होतो, पण माझ्या विधानाचा चुकीचा अर्थ काढला गेला. जर, माझी कुठली गोष्ट चुकीची वाटली असेल, तर, मी माफी मागतो. मी माझे शब्द मागे घेतो,” असं नितीश कुमार म्हणाले.
नितीश कुमार लोकसंख्या नियंत्रणाबद्दल बोलत होते. एक महिलेने ठरवलं, तर लोकसंख्या नियंत्रणात येऊ शकते, अशा आशयाचे वक्तव्य त्यांनी केले होते. त्यानंतर नितीश कुमार यांच्या विधानावरुन वाद निर्माण झाला होता. यासंदर्भात नितीश कुमार म्हणाले की, “माझ्या वक्तव्यामुळे कोणाचे मन दुखावले असेल तर मी माफी मागतो. लोकसंख्या नियंत्रणासाठी शिक्षण अत्यंत महत्त्वाचे आहे. शिक्षणानंतर लोकसंख्येच्या वाढीमध्ये होणारे बदल सांगणे एवढेच माझे उद्दिष्ट होते. मी माझे शब्द परत घेतो, मी जे बोललो ते चुकीचे असेल किंवा माझ्यामुळे काही दुखावले असतील तर मी माफी मागतो. माझ्या विधानावर कोणी टीका करत असेल तर आम्ही दिलगिरी व्यक्त करतो.”
हे ही वाचा:
अलाहाबाद विद्यापीठातील विद्यार्थ्यांना आता श्रीकृष्णाचे व्यवस्थापन धडे
आसाममध्ये रंगणार ‘जाणता राजा’चे प्रयोग
रश्मिकाच्या समर्थनार्थ अभिनेते सरसावले!
दापोलीतील वादग्रस्त साई रिसॉर्ट पाडण्याचे आदेश
दरम्यान, नितीश कुमार यांच्या अश्लिल विधानाबाबत राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा म्हणाल्या की, “विधानसभेत नितीश कुमार यांनी केलेले विधान हे सी ग्रेड चित्रपटातील संवादासारखे वाटत होते. त्यांनी विधानसभेतील सर्व महिला आणि पुरुषांसमोर हे विधान केले आणि सर्वात वाईट गोष्ट म्हणजे तिथे उपस्थित असलेले लोक हसत होते. त्यांनी माफी मागितली आहे, पण नुसती माफी मागणे हा उपाय नाही. बिहारच्या अध्यक्षांनी त्यांच्या विरोधात पाऊल उचलले पाहिजे,” अशी मागणी शर्मा यांनी केली.