नितीन गडकरींनी उद्धव ठाकरेंना लिहिले पत्र
“शिवसेनेचे नेते हे गुंडगिरी करत कामात अडथळा आणत आहेत.” असं सांगणारं खरमरीत पत्र केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलं आहे. शिवसेनेच्या नियमबाह्य कामामुळे आणि दहशतीमुळे राष्ट्रीय महामार्गाची कामं बंद पडतील, असा इशाराच मंत्री नितीन गडकरी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिला आहे. वाशिम जिल्ह्यातील रस्ते कामांना स्थानिक शिवसेना आमदार खासदारांकडून विरोध होत असल्याचं गडकरी यांनी पत्रात म्हटलंय.
गेल्या अनेक महिन्यांपासून राष्ट्रीय रस्ते विकासाची कामं रखडली आहेत. मी माहिती घेतल्यावर स्थानिक शिवसेना प्रतिनिधींनी ही काम थांबवली असल्याचं मला कळलं, असंही गडकरी यांनी पत्रात म्हटलं आहे. तसंच स्थानिक नेत्यांचे जर असेच प्रकार सुरु राहिले तर महाराष्ट्रात रस्त्यांच्या कामांना नविन मंजुरी देण्याबाबत परत विचार करावा लागेल, असा गर्भित इशारा गडकरींनी मुख्यमंत्र्यांना दिला आहे.
पुढे पत्रात गडकरींनी आणखी स्फोटक मुद्दा मांडला आहे. विविध प्रकारच्या नियमबाह्य मागण्यांनी अधिकारी आणि कंत्राटदार हैराण झाले आहेत. मागण्या पुर्ण न केल्याने काम बंद पाडण्यापर्यंत त्यांची मजल गेली आहे, असं उद्विग्न आणि आक्रमक भावनाही गडकरींनी पत्राच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांच्या कानावर घातल्या आहेत.
नितीन गडकरींनी हे पत्र उद्धव ठाकरेंना लिहिले
१. अकोला आणि नांदेड या २०२ किमी राष्ट्रीय महामार्गाच्या लांबीमध्ये चौपदरीकरणाची कामे चार पॅकेजेसमध्ये सुरु आहेत. गेडशी ते वाशिम या पॅकेज-२ मध्ये वाशिम शहरासाठी बायपास (लांबी १२ किमी) निर्माण करण्याचे काम सुद्धा समाविष्ट आहे. परंतु, प्रस्तुत बायपास व मुख्य रस्त्याचे काम तेथील शिवसेना लोकप्रतिनिधींनी थांबवले असल्याचे मला सांगण्यात आले आहे.
२. या मतदारसंघात सुरु असलेल्या मालेगाव ते रिसोड या राष्ट्रीय महामार्गेच काम एक पूल वगळता पूर्णत्वास आलेले आहे. या लांबीमध्ये पैनगंगा नदीवर उंच पुलाचे काम अर्धवट स्वरुपात आहे. ते पूर्ण करण्यासाठी कंत्राटदाराला मज्जाव केला जात आहे. काम सुरु केल्यास कार्यकर्ते येऊन धमक्या देतात. त्यामुळे कंत्राटदाराने आहे त्या स्थितीत काम अंतिम करण्याबाबत विनंती केली आहे.
३. पुलगाव-कारंजा-मालेगाव-मेहकर-सिंदखेडराजा हा राष्ट्रीय महामार्ग अतिशय खराब अवस्थेत आहे. त्याच्या दुरुस्तीचे काम (अंदाजे किंमत १३५ कोटी) आमच्या मंत्रालयाने हाती घेतले. परंतु वाशिम लोकसभा मतदारसंघातील लांबी वगळता इतर ठिकाणचे काम पूर्णत्वास आलेले आहे. वाशिम जिल्ह्यातील काम, विशेषतः सेलू बाजार गावातून जाणाऱ्या रस्त्याचे काम शिवसेना कार्यकर्त्यांनी थांबवले होते, अशी माहिती मला देण्यात आली. परिसरातील लोकांच्या मागणीनुसार आणि रस्ता धोकादायक स्थितीत असल्यामुळे कंत्राटदाराने पुन्हा काम सुरु केले असता शिवसेना कार्यकर्त्यांनी मशिनरीची जाळपोळ करुन कंत्राटदाराचे अधिकारी-कर्मचारी-कामगार यांच्यात दहशत निर्माण केली. त्यामुळे ते काम पुन्हा बंद झाले आहे.
४. उपरोक्त बाबी लक्षात घेता वाशिम जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गावरील कामे यापुढेही सुरु ठेवावीत की कसे? याबद्दल आमचे मंत्रालय आता गांभीर्याने विचार करत आहे. ही कामे आहे त्या स्थितीत अंतिम केल्यास ती वाहतुकीसाठी धोकादायक ठरतील. अपघाताचे प्रमाण वाढेल आणि त्यामुळे जनतेच्या असंतोषाला तोंड द्यावे लागेल.
५. हे असंच चालत राहिलं तर महाराष्ट्रातील राष्ट्रीय महामार्गावरील कामं मंजूर करण्याच्या संदर्भात आमच्या मंत्रालयाला विचार करावा लागेल. यामुळे महाराष्ट्राचे आणि जनतेचे नुकसान होईल.
हे ही वाचा:
अखंड भारत संकल्पदिनाला मोदींनी केले ‘हे’ ट्विट
महाग पेट्रोलवर हा नवा पर्याय येणार
अखंड भारत संकल्प दिन म्हणजे नेमके काय रे भाऊ?
पर्यावरण संरक्षणासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय
ही कामे बंद केली तरी आपण लोकांच्या दृष्टीने अपराधी ठरु. तसे झाले तर महाराष्ट्रातील नागरिक व लोकप्रतिनिधी म्हणून माझ्या मनात कायमची खंत राहील. ही कामे पुढे न्यायची असतील तर आपला हस्तक्षेप मला आवश्यक वाटतो. आपण यातून कृपया मार्ग काढावा, अशी माझी विनंती आहे.