काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संबंधी वादग्रस्त वक्तव्य केले. यावरून भाजप आक्रमक झाली असून अनेक नेत्यांनी पटोले यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही आता नाना पटोले यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेत नाना पटोले यांना अटक करण्याची मागणी पोलिसांकडे केली आहे.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ट्विट करत नाना पटोले यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी वापरलेली भाषा अतिशय आक्षेपार्ह आणि निंदनीय आहे. नाना पटोलेंवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात यावी, अशी मागणी नितीन गडकरी यांनी पोलीस प्रशासनाकडे केली आहे.
पंतप्रधान श्री @narendramodi जी यांच्याविषयी महाराष्ट्र कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी वापरलेली भाषा अतिशय आक्षेपार्ह व निंदनीय आहे. माझी पोलीस प्रशासनाला विनंती आहे, की पटोलेंवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात यावी. @BJP4India
— Nitin Gadkari (@nitin_gadkari) January 17, 2022
भंडारा जिल्ह्यातील रविवारी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणूक प्रचाराच्या अखेरच्या दिवशी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे एक वक्तव्य चांगलेच वादग्रस्त ठरले. या प्रचार सभेत नाना पटोले यांनी ‘मी मोदीला मारू शकतो व शिव्याही देऊ शकतो’ असे वक्तव्य केले आहे. हे वक्तव्य केल्यानंतर त्याचा व्हिडीओ महाराष्ट्रात व्हायरल झाला.
हे ही वाचा:
‘भारतात गुंतवणूक करण्याची ही सर्वोत्तम वेळ’
अफगाणिस्तान भूकंपाच्या धक्क्यांनी हादरले; २६ जणांचा मृत्यू
गुरु रविदास जयंतीमुळे पंजाब निवडणुकीच्या तारखा बदलल्या
‘मेस्टा’ने केल्या राज्यातील काही शाळा सुरू
विधानसभा विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनीही नाना पटोले यांच्या वक्तव्यानंतर टीका केली आहे. काँग्रेस पक्षाला लोकशाहीतील राजकीय पक्ष म्हणायचे की दहशत पसरवणारे संघटन म्हणायचे? असा सवाल फडणवीस यांनी केला आहे. नानाभाऊ केवळ शारीरिक उंची असून चालत नाही, वैचारिक-बौद्धिक उंची पण असावी लागते? अशी टीका फडणवीस यांनी पटोले यांच्यावर केली.