विधानसभेत बुधवार, २ ऑगस्ट रोजी औरंगजेबाच्या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात आरोप- प्रत्यारोप पाहायला मिळाले. विधानसभेत कायदा सुव्यवस्थेवरील लक्षवेधी मांडताना भाजपा आमदार नितेश राणे यांनी औरंगजेबाचे उदात्तीकरण होत असल्याचा मुद्दा मांडला यावेळी नितेश राणे आणि सपा आमदार अबू आझमी यांच्यात शाब्दिक चकमक झाली.
विधानसभेत बोलताना नितेश राणे म्हणाले की, “धर्मवीर संभाजीराजेंविरोधात कटकारस्थान करणाऱ्या औरंगजेबाचे स्टेट्स ठेवून वातावरण खराब केलं जात आहे. पोलिसांनी या संदर्भात कारवाई केली आहे. वंदे मातरम म्हणत नाहीत, पण जेव्हा मिरवणूक काढली जाते तेव्हा औरंगजेब माझा बाप आहे, असं सांगणारे काही लोक आहेत. हे गद्दार लोक आहेत. या लोकांना वंदे मातरम म्हणायचं नाही. जिल्ह्याजिल्ह्यात सर तन से जुदा अशा घोषणा द्यायच्या आहेत. या लोकांना शिवरायांच्या महाराष्ट्रात राहायचा अधिकार नाही. अशा लोकांनी पाकिस्तानात निघून जावं. गृहमंत्र्यांना विनंती आहे की, त्यांनी या प्रकरणाची चौकशी करावी. कशाला पाहिजे हे लोक? राज्याच्या कायदा आणि सुव्यवस्थेची आम्हाला चिंता आहे. विविध जिल्ह्यात स्टेट्स ठेवणारी ही मुलं आहेत. त्यांचा मास्टरमाइंड कोण? असे सवाल विधानसभेत नितेश राणे यांनी मांडला.
नितेश राणे यांनी विचारलेल्या प्रश्नांना गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं. देवेंद्र फडणवीस बोलताना म्हणाले की, “या देशात औरंगजेब हा कुणाचा नेता होऊ शकत नाही. औरंगजेब मुसलमानाचाही नेता होऊ शकत नाही. या देशावर त्याने आक्रमण केलं होतं. भारतातील मुसलमान औरंगजेबाचे वंशज नाहीत. तो हिरो होऊ शकत नाही. हिरो फक्त शिवाजी महाराज, महाराणा प्रताप आणि एपीजे अब्दुल कलाम होऊ शकतात,” असे देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केले.
“यापूर्वी कधी कोणत्याही मुस्लिम समुदायाकडून औरंगजेबाचं स्टेट्स ठेवणं, त्याचं उदात्तीकरण करणं किंवा फोटो काढून मिरवणूक काढणं असं होत नव्हतं. मग असे अचानक स्टेटस कसे ठेवले जातात? यामागे कुणाचं डिझाईन आहे का? जाणीवपूर्वक तेढ निर्माण करण्याचा उद्देश आहे का? जाणीवपूर्वक कुणी समाजात तेढ निर्माण करण्यासाठी तरुणांना उचकावत आहे का? याचे काही इनपूट्स आमच्याकडे आहेत. ते सभागृहात सांगत नाही,” असं स्पष्टीकरण देवेंद्र फडणवीस यांनी दिलं.
“या प्रकरणी एसआयटी नेमली नसली तरी या प्रकरणावर एटीएस काम करत आहे. काही काम आयबी करत आहे. गरज पडली तर एसआयटीही नेमू. जर कोणत्या पोलिसांची दिरंगाई असेल तर त्यांच्यावरही कारवाई केली जाईल,” असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.
छत्रपती शिवाजी महाराजांचा एक नंबरचा शत्रू होता, त्या औरंगजेबाचे फोटो स्टेटसला ठेवले गेले. औरंगजेबावर एवढं प्रेम असेल तर पाठवून द्या त्यांच्याकडे, असं नितेश राणे म्हटलं. यावेळी नितेश राणे सातत्यानं समाजवादी पार्टीचे नेते अबू आझमी यांच्याकडे पाहून हातवारे करत होते. यावेळी तुम्ही माझ्याकडे बघून तुमचं म्हणणं मांडा, अशी सूचना विधानसभा अध्यक्षांनी नितेश राणेंना केली.
आमदार अबू आझमी काय म्हणाले?
आमदार अबू आझमी म्हणाले की, “काही मुस्लीम तरूणांनी औरंगजेबाचे स्टेटस ठेवले. त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला. मात्र, त्यानंतर डॉ. प्रकाश आंबेडकर औरंगजेबाच्या कबरीवर गेले. माथा टेकवला. त्यांनी हिंमत असेल तर माझ्यावर गुन्हा दाखल करा असं आव्हान दिलेलं. या देशात दोन कायदे चालतात का? ज्यानं स्टेटस ठेवलं त्यांच्यावर गुन्हा आणि जे आव्हान देतात त्यांच्यावर गुन्हा दाखल होत नाही. ट्रेनमध्ये गोळीबार झालाय. मुस्लीमांना हिंदुमध्ये बदनाम करायचं हे काम भाजपा करतंय. संपूर्ण देशात दहशतीचं वातावरण आहे. ट्रेनमध्ये बुरखा घालून, दाढी वाढवून फिरता येत नाही. मेरी कौम चिल्ला रही है, कोई मदत करनेवाला नही है. नथुराम गोडसेचा फोटो लावतात. हे जाणुनबुजून केलं जातंय. देशाचं वातावरण खराब केलं जातंय,” असे आरोप आझमी यांनी केले.
हे ही वाचा:
स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल आक्षेपार्ह लिहिणाऱ्या ‘शिदोरी’ वरही गुन्हा दाखल करणार
गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा ९४ लाख अधिक प्राप्तिकर विवरणपत्रे
प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिली होती ऑफर
भारतीय कुस्ती महासंघाच्या निवडणुकीत १५ पदांसाठी दुप्पट अर्ज
अबू आझमींच्या प्रश्नांवर देवेंद्र फडणवीसांचे उत्तर
“भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नातू प्रकाश आंबेडकर जेव्हा तिकडे गेले तेव्हा तुम्ही महिमामंडन करू नका असं मी बोललो होतो. औरंगजेब शासक होता. दोन धर्मांमध्ये तेढ निर्माण करणे हा गुन्हा आहे. त्याठिकाणी माथा टेकवणं गुन्हा नाही. आपण लोकशाहीत निवडून येतो. पण काही गोष्टी राष्ट्रहिताच्या असतात. राष्ट्रहिताबाबत तडजोड करू नये. देशाच्या इतिहासात अनेक मुस्लीम नेते आहेत ज्यांनी मातृभूमीसाठी बलिदान दिले आहेत. राष्ट्रहिताविरोधात जाणाऱ्या कुठल्याही धर्माचा असेल तर त्याला सोडलं जाणार नाही.” असा इशारा देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे.