मुख्यमंत्र्यांना शस्त्रक्रियेनंतर त्रास होऊ नये म्हणून वर्षा बंगला ते विधान भवन मार्ग दुरुस्ती करून चकाचक करण्यात आला आहे. यावरून भाजप नेते आणि आमदार नितेश राणे यांनी सिंधुदुर्गमध्ये आयोजित पत्रकार परिषदेमध्ये बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. आमच्या राज्याला मुख्यमंत्रीच राहिला नसल्याची टीकाही राणे यांनी केली.
नितेश राणे म्हणाले की, महाविकास आघाडीच्या काळात जनतेचे केवळ हाल सुरू आहेत. रस्त्यांची चाळणी झाली आहे. जागोजागी खड्डे पडले आहेत. त्यातून सामान्य जनता मार्ग काढत असते. तर दुसरीकडे मात्र राजाचे रस्ते हे गुळगुळीत आहेत. आम्ही जेव्हा रस्त्यांच्या विकासासाठी पैसे मागतो, तेव्हा निधी शिल्लक नसल्याचे आम्हाला सांगितले जाते आणि आता विधानसभा मार्गावरील रस्ते गुळगुळीत बनवले जातायत, असा खोचक टोला नितेश राणे यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला आहे. राज्यातील सर्व सुविधा एकाच कुटुंबासाठी का? असा सवाल उपस्थित करत नितेश यांनी ठाकरे कुटुंबावर निशाणा साधला आहे.
हे ही वाचा:
१७० बहुमत असतानाही महाविकास आघाडीच्या मानगुटीवर भीतीचे भूत
ठाकरे सरकार विरोधात अभाविप आक्रमक! मुंबई विद्यापीठाबाहेर आंदोलन
‘ठाकरे सरकारच्या काळात एकही परीक्षा घोटाळ्याशिवाय झालेली नाही’
इम्पेरिकल डेटासाठी राज्य सरकारकडून निधी मंजूर
राज्याचे अधिवेशन सुरू आहे, मात्र मुख्यमंत्री कुठेही दिसत नाहीत. त्यामुळे राज्य नेमके कोण चालवत आहे, असा प्रश्न पडला आहे. राज्याचा चार्ज सध्या कोणाकडे दिला आहे, याचीही काही कल्पना नाही. मुख्यमंत्री अधिवेशनात कुठे दिसत नाहीत. मग अशा परिस्थितीत जनतेला न्याय कसा मिळणार? असा सवाल नितेश राणे यांनी उपस्थित केला आहे.
मुख्यमंत्र्यांवर शस्त्रक्रिया झाल्याने ते सध्या अधिवेशनाला उपस्थित नाहीत. मात्र, ते त्यांच्या वेळेनुसार उपस्थित राहतील असे आदित्य ठाकरे यांनी सांगितले होते. मुख्यमंत्र्यांना त्रास होऊ नये म्हणून मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवास्थान असलेला वर्षा बंगला ते विधान भवन मार्ग दुरुस्त करून चकचकीत करण्यात आला आहे.