गेल्या अनेक दिवसांपासून कोठडीत असणारे भाजप आमदार नितेश राणे आज जामिनावर बाहेर आल्यानंतर त्यांनी ठाकरे सरकार आणि उद्धव ठाकरे यांच्यावर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. संतोष परब हल्ला प्रकरणी नितेश राणे हे अडचणीत आले होते. मात्र, अखेर बुधवारी १० फेब्रुवारी रोजी सिंधुदुर्ग सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.
जामीन मिळाल्यावर बाहेर येताच नितेश राणे यांनी आक्रमक भूमिका घेत पुन्हा एकदा ठाकरे सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. ठाकरे सरकारवर त्यांनी प्रश्नांच्या फैरी झाडल्या आहेत. जेव्हा सरकार पडण्याची वेळ येते, तेव्हा मुख्यमंत्री गळ्यात बेल्ट का घालतात? लतादीदींच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री जातात, त्यावेळी कुठलाही बेल्ट नसतो, अशी खोचक टीका त्यांनी केली आहे. अधिवेशनावेळी ते आजारी कसे पडतात? चौकशीवेळीच महाविकास आघाडीतील नेत्यांना कोरोना कसा होतो? असे अनेक खोचक सवाल त्यांनी विचारले.
त्यानंतर नितेश राणे यांनी न्यायालयाच्या निर्णयाबद्दल आभार मानले आहेत. तसेच आपण कुठल्याही तपासकार्यातून लांब गेलेलो नव्हतो, कुठल्याही तपासकार्यात अडथळे आणले नाही, असेही नितेश राणे म्हणाले.
हे ही वाचा:
सचिन वाझे अनिल देशमुखांविरुद्ध साक्ष देणार; ईडीला लिहिले पत्र
अशक्य केले शक्य!…पंतप्रधानांनी केले मुख्यमंत्री योगींचे भरभरून कौतुक
रुपेरी पडद्यावर उलगडणार वीर मराठ्यांची ‘पावन’गाथा
कणकवली शहरातील नरडवे तिठा येथे जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांचे प्रचारप्रमुख असलेल्या संतोष परब यांच्यावर हल्ला झाला होता. या हल्ल्यातील संशयित आरोपी अटक केल्यानंतर तपासाचे धागेदोरे आमदार नितेश राणे यांच्यापर्यंत गेले होते. त्यामुळे कणकवली पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता सत्र न्यायालयाने जामीन मंजूर करताना त्यांना काही अटी घातल्या आहेत.