‘कोल्हापुरात उपचारादरम्यान माझ्या हत्येचा कट रचला होता’

‘कोल्हापुरात उपचारादरम्यान माझ्या हत्येचा कट रचला होता’

राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात भाजपा आमदार नितेश राणे यांनी सरकारवर काही गंभीर आरोप केले आहेत. संतोष परब यांच्यावरील खुनी हल्लाप्रकरणी भाजपाचे आमदार नितेश राणे यांना अटक केल्यानंतर नितेश राणे यांना कोल्हापुरला नेण्यात आलं होतं. दरम्यान, नितेश राणेंनी छातीत दुखत असल्याची तक्रार केली होती. यानंतर त्यांना कोल्हापूरातील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेव्हा ‘मला मारून टाकण्याची योजना होती’ असा गौप्यस्फोट नितेश राणे यांनी केला आहे.

“सिंधुदुर्ग जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीनंतर मला एका प्रकरणात गोवण्यात आले. त्यानंतर कोल्हापूरच्या शासकीय रुग्णालयात मला दाखल केले होते. त्यावेळी डॉक्टरांनी मला सिटी अँजिओग्राफी करण्याचा आग्रह केला. मात्र, तिथल्या एका कर्मचाऱ्याने येऊन सांगितले की सिटी अँजिओग्राफी करु नका. कारण त्यानिमित्ताने इंक शरीरात टाकायला लागते. इंक टाकून तुम्हाला मारुन टाकण्याची योजना आहे. त्यामुळे या टेस्टसाठी होकार देऊ नका असेही सांगितले,” असे नितेश राणे म्हणाले.

“राज्यात गुन्हे वाढत आहेत. पण राज्य सरकारकडून त्या संबंधी खोटी माहिती दिली जात आहे. फार मोठ्या मोठ्या गोष्टीत या लोकांना लक्ष घालायचे आहे, यांना फार मोठी काम करायची आहेत. विरोधी पक्षातील लोकांवर गुन्हे दाखल करायचे आहेत,” असा टोला नितेश राणे यांनी लगावला. “पालिकेला तर काहीच काम राहिले नाही. पालिकेच्या आयुक्ताला फक्त आता लोकांच्या घराची मेजरमेन्टची काम राहिली आहेत. यांना विचारले तर हे म्हणतात की वरुन आदेश आले. नेमके वरून आदेश येतात तरी कुठून?” असा सवाल नितेश राणे यांनी विचारला आहे.

“पोलिसांनी आता कामावर लक्ष द्यावे, जनतेवर लक्ष द्यावे. नितेश राणे काय करतात, कोणते कपडे घालतात याकडे लक्ष देऊ नये,” असाही टोला नितेश राणे यांनी लगावला.

हे ही वाचा:

…आणि पंतप्रधान मोदींनी केली चित्रकार आयुषची इच्छा पूर्ण

माजी सरन्यायाधीश आर सी लाहोटी यांचे निधन

काश्मीर फाईल्सने जमवला २०० कोटींचा गल्ला! रचला ‘हा’ अनोखा विक्रम

विधानसभेत एकमताने ‘शक्ती कायदा’ मंजूर

दिशा सालियन प्रकरणावरही नितेश राणे यांनी भाष्य केले. “दिशा सालियनची आत्महत्या असेल तर मग सीसीटीव्ही का गायब केले. त्या ठिकाणचा वॉचमन गायब झाला, वहीची पाने गायब झाली. रोहन रॉय गायब आहे. दिशाची आत्महत्या नाही, ती हत्या आहे,” असा दावा नितेश राणे यांनी केला.

Exit mobile version