गेल्या काही दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांनी त्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी संप पुकारला असून सरकारने काही मागण्या पूर्ण केल्या आहेत. मात्र, एसटीचे सरकारमध्ये विलनीकरण व्हावे या प्रमुख मागणीसाठी कर्मचाऱ्यांनी हा संप अजूनही सुरू ठेवला आहे. विरोधकांनी या मुद्द्यावरून सरकारला धारेवर धरले असून यावर आता भाजप नेते नितेश राणे यांनीही सरकारवर टीकेची तोफ डागली आहे.
राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर भाजप नेते नितेश राणे यांनी भाष्य केले आहे. त्यांनी राज्याचे परिवहनमंत्री अनिल परब यांच्यावर टीका केली आहे. सरकार आणि संबंधित मंत्री आता समिती जाहीर करणार आहेत. मग १०० कोटींची वसुली करताना समिती जाहीर केली होती का, सगळे खिशात टाकले ना, मग आता या कर्मचाऱ्यांसाठी निर्णय घेताना कोर्टाने सांगायची वाट का बघावी, असा सवाल नितेश राणे यांनी केला आहे. ‘हे परिवहन नाही तर परिवार मंत्री आहेत आणि विशेषतः ठाकरे परिवार मंत्री आहेत.’ असा खोचक टोलाही नितेश राणेंनी अनिल परबांना लगावला आहे.
३६ एसटी कर्मचाऱ्यांच्या त्या आत्महत्या नाहीत तर ठाकरे सरकारने केलेल्या त्या हत्याच..!
परिवहनमंत्र्यांवर हत्ये चा गुन्हा दाखल करा!!
@BJP4Maharashtra pic.twitter.com/92s0ExMYsK— nitesh rane (@NiteshNRane) November 8, 2021
‘जेवढी धावपळ तुम्ही आर्यन खानसाठी केली तेवढी शेतकरी आणि एसटी कर्मचाऱ्यांसाठी केल तर आशीर्वाद लाभेल.’ असेही ते म्हणाले. ‘परब तुम्ही पोलिसांच्या गराड्याच्या बाहेर गेलात कर कसे परत जाता बघू. डोक्याला टेंगुळ देऊ.’ असा इशाराही नितेश राणेंनी दिला आहे. ‘कर्मचाऱ्यांनी केलेल्या आत्महत्या या आत्महत्या नाहीत, त्या हत्या आहेत, त्यामुळे संबंधित मंत्र्यावर गुन्हा दाखल करायला हवा,’ असेही नितेश राणे म्हणाले.