मुंबई महापालिका निवडणुकीसाठी नितेश राणेंवर मोठी जबाबदारी

मुंबई महापालिका निवडणुकीसाठी नितेश राणेंवर मोठी जबाबदारी

मुंबई महापालिकेची निवडणूक अवघी काही महिन्यांवर आली असताना भारतीय जनता पार्टी मुंबईने कंबर कसली आहे. बुधवार, १४ जुलै रोजी मुंबईत भाजपाने याच दृष्टीने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. भाजपाचा आक्रमक चेहरा म्हणून ओळखले जाणारे आमदार नितेश राणे यांना मुंबई महापालिकेच्या दृष्टीने तयार करण्यात आलेल्या पक्षाच्या कोअर कमिटीत घेण्यात आले आहे.

मुंबई महापालिका निवडणुकीतील शिवसेनेची सत्ता उलथवून टाकण्यासाठी भाजपाने सुरवातीपासूनच चंग बांधला आहे. त्यासाठी भाजपा पूर्णपणे तयारीला लागला आहे. त्याचाच एक भाग म्हणून आता कणकवलीचे आमदार नितेश राणे यांचा समावेश मुंबई भाजपाच्या कोअर कमिटीमध्ये करण्यात आला आहे. ही कमिटी मुंबई महापालिका निवडणुकांमध्ये अतिशय महत्वाची भूमिका बजावणार आहे.

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्री पदासाठी शिवसेनेने युती तोडून महाविकास आघाडी सोबत नवा घरोबा केल्यापासून भाजपा आणि शिवसेनेचे संबंध पुरेच तुटले आहेत. त्यातच राणे कुटुंबीय आणि शिवसेनेचे संबंध हे जगजाहीर आहेत. नितेश राणे आणि त्यांचे बंधू निलेश राणे हे नियमितपणे ठाकरे सरकारवर आणि त्यातही शिवसेनेवर आसूड ओढत असतात. त्यामुळे सत्ताधारी शिवसेनेला ‘त्यांच्याच भाषेत’ उत्तर देण्यासाठी राणे यांची नियुक्ती फायद्याची ठरण्याची शक्यता आहे.

हे ही वाचा:

भारताच्या ‘या’ खेळाडूला कोरोनाची लागण

सरकारचे बेकायदेशीर बांधकामांकडे दुर्लक्ष

इंधनाच्या किंमती कमी करण्यासाठी मोदी सरकारची महत्वाची पावले

‘हर घर जल’…२३ महिन्यांत ४.५ घरांना नळ जोडणी

दुसरीकडे मुंबईच्या मतदारांमध्ये कोकणी मतदारांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. मुंबईचे असे अनेक भाग आहेत जिथे कोकणी माणसाचे प्राबल्य आहे. कोकणी माणूस हा शिवसेनेचा पारंपारिक मतदार मानला जातो. त्यामुळे या मतदाराला भाजपाकडे खेचण्याचा दृष्टीनेही राणे यांची भूमिका महत्वाची ठरणार आहे. त्यामुळे आगामी मुंबईत महापालिकेची निवडणूक चांगलीच तापणार यात शंका नाही.

Exit mobile version