महापालिकेचे तरण तलावांचे आता खासगीकरण होत आहेत, असा आरोप नितेश राणे यांनी नुकताच केलेला आहे. बृहन्मुंबई क्रीडा आणि ललित प्रतिष्ठान अंतर्गत मुलुंड क्रीडा संकुल तसेच अंधेरीतील शहाजीराजे भोसले क्रीडा संकुल हे महापालिकेच्या अखत्यारीत चालवले जाते. परंतु या दोन्ही संकुलातील बॅडमिंटन कोर्ट आणि स्विमिंग पुलाचे खासगीकरण करण्याचा घाट घालण्यात आला आहे, असे भाजपचे आमदार नितेश राणे यांनी म्हटले आहे. या गोष्टीला विरोध दर्शवत राणे यांनी यांनी याप्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्रं लिहिलं आहे. तसेच या प्रकरणाची चौकशीची मागणी आता त्यांनी राज्यसरकारकडे केलेली आहे.
नितेश राणे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्रं लिहून याबाबतची माहिती दिली आहे. ललित कला प्रतिष्ठानच्या अधिपत्याखाली मुलुंडमधील क्रीडा संकुलाचा तरण तलाव आणि अंधेरीतील शहाजी राजे भोसले क्रीडा संकुलाचा कारभार आहे. प्रतिष्ठानची स्थापना केल्यानंतर यावर महापालिकेचे नियंत्रण असावे असे तत्कालीन शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंना वाटले होते. म्हणून त्यांनी या प्रतिष्ठानचे अध्यक्ष महापौर आणि उपाध्यक्ष महापालिका आयुक्त असतील अशी तजवीज करून ठेवली. यात सदस्य म्हणून कला व क्रीडा क्षेत्रातील मान्यवर घेतले. यामागे बाळासाहेबाचा हेतू स्पष्ट व स्वच्छ होता. परंतु, आता मात्र तसे राहिले नाही, असं राणे यांनी म्हटलं आहे.
हे ही वाचा:
शरद पवारांनी पुन्हा व्यक्त केली ईडीबद्दलची खदखद
ऐका का झाली अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाची स्थापना…
जावेद अख्तर हा कुंपणावरचा कावळा
फोर्ब्सच्या यादीमुळे मिळाला नवा ‘आनंद’
मुख्य म्हणजे या प्रतिष्ठानवर विशेष कार्य अधिकारी (ओएसडी) देवेंद्रकुमार जैन नियुक्त आहेत. त्यांची नियुक्ती झाल्यानंतर स्विमिंग पूल आणि बॅडमिंटन कोर्टच्या खासगीकरणाचा घाट घातला जातोय. विशेष महत्वाची बाब म्हणजे देवेंद्र कुमार जैन हे महापौरांचेही ओएसडी आहेत. याचा अर्थ स्पष्ट आहे की, महापौरांचा इंटरेस्ट असल्याशिवाय या खासगीकरणाचे पाऊल उचलणे शक्य नाही. जैन हे कुणाच्या निर्देशावरून सामान्य मुंबईकरांच्या हक्काचा जलतरण तलाव आणि बॅडमिंटन कोर्ट विकायला निघाले आहेत आणि ते कुणाच्या घशात घालायचे आहेत हेही अगोदरच ठरले असल्याची चर्चा आहे, असंही राणे यांनी म्हटलं आहे.