गणेश उत्सव हा कोकणवासीयांसाठी एक अतिशय महत्त्वाचा असा सण. नोकरीच्या निमित्ताने मुंबई-ठाण्यात येऊन स्थायिक झालेला कोकणी माणूस दरवर्षी गणेशोत्सवाला मात्र कोकणातल्या आपल्या गावी जातोच जातो. या संपूर्ण काळात कोकणच्या दिशेने धावणाऱ्या बस आणि रेल्वे गाड्यांवर चांगलाच ताण पडलेला दिसतो. त्यामुळे दर वर्षी विविध संस्था, संघटना, लोकप्रतिनिधी यांच्या मार्फत कोकणसाठी प्रवासाची काही ना काही विशेष सोय केली जाते.
भारतीय जनता पार्टीचे आमदार नितेश राणे हे देखील अशाप्रकारे दरवर्षी कोकणी माणसासाठी विशेष अशा बस सेवेची व्यवस्था करत असतात. पण यावर्षी मात्र त्यांनी बस ऐवजी विशेष अशा एक्सप्रेसची घोषणा केली आहे मोदी एक्सप्रेस असे त्याला नाव देण्यात आले आहे मुंबईतून गणेशोत्सव काळात कोकणकडे येऊ इच्छिणाऱ्या प्रवाशांसाठी ही सोय करण्यात आली आहे.
हे ही वाचा:
यंदा गणेशोत्सव मंडळांचा उत्साह फिका
मिलिंद नार्वेकरांच्या बंगल्यावर फिरला बुलडोझर, सोमैय्या म्हणतात ‘पुढचा नंबर…’
कल्याण स्थानकात गर्दुल्यांची गर्दी
एसटीच्या लोगोलाच केला ‘जय महाराष्ट्र’
ट्विटरवर एक व्हिडिओ संदेश पोस्ट करत नितेश राणे यांनी या उपक्रमाविषयी माहिती दिली. नितेश राणे यांचे वडील आणि कोकणचे सुपुत्र राज्यसभा खासदार नारायण राणे यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान देऊन पंतप्रधान मोदींनी कोकणाला आशिर्वाद दिला आहे. त्यामुळे माननीय पंतप्रधानांचे आभार मानण्यासाठी या गाडीला ‘मोदी एक्सप्रेस’ असे नाव देत असल्याचे आमदार नितेश राणे यांनी सांगितले आहे.
कशी असणार मोदी एक्सप्रेस?
ही ट्रेन दादर वरून सुटेल. अठराशे नागरिकांना या गाडीतून प्रवास करता येईल. कणकवली, वैभववाडी आणि सावंतवाडी या ठिकाणांपर्यंत ही गाडी प्रवाशांना घेऊन जाईल. दादरच्या फलाट क्रमांक आठ वरून ही गाडी सुटेल.
हा प्रवास संपूर्णपणे विनामूल्य स्वरूपाचा असणार आहे. तर या प्रवासादरम्यान नागरिकांना एक वेळचे जेवण देखील भाजप आमदार नितेश राणे यांच्यामार्फत पुरवले जाणार आहे. या गाडीने प्रवास करू इच्छिणाऱ्या नागरिकांनी कुडाळ, वैभववाडी आणि सावंतवाडी येथील भाजपा मंडळ अध्यक्षांची संपर्क साधावा असे आवाहन नितेश राणे यांनी केले आहे.