‘तोंड सांभाळून बोला…’

उदयनिधी स्टॅलिन यांच्या वक्तव्यावर निर्मला सीतारामन यांनी सुनावले

‘तोंड सांभाळून बोला…’

तमिळनाडूचे नेते उदयनिधी स्टॅलिन यांनी केंद्र सरकारकडून तमिळनाडूला निधी मिळत नसल्याचा दावा करत ‘आम्ही कोणाच्या बापाचा पैसा मागत नसून तमिळनाडूच्या नागरिकांनी भरलेल्या कररूपी निधीतील आमचा वाटा मागत आहोत,’ अशी टीका केली होती. त्यावर ‘तोंड सांभाळून बोला. एका राजकीय नेत्याला शोभतील, अशा पद्धतीने बोला,’ अशा शब्दांत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शुक्रवारी उदयनिधी यांना सुनावले.

तमिळनाडूचे मंत्री आणि मुख्यमंत्री स्टॅलिन यांचे पुत्र उदयनिधी यांनी तमिळनाडूला केंद्र सरकारकडून निधी मिळत नसल्याचा आरोप केला होता आणि आम्ही आमच्या हक्काचे पैसे मागत आहोत, कोणाच्या बापाचे नाहीत, अशी भाषा वापरली होती. या वक्तव्यावर निर्मला सीतारामन यांनी नाराजी व्यक्त केली. ‘ते एक मंत्री असून त्यांनी जबाबदारीने वक्तव्य केले पाहिजे,’ असे सीतारामन यांनी त्यांना सुनावले.

‘ते वडिलांच्या पैशांबाबत बोलत आहेत. ते त्यांच्या वडिलांच्या संपत्तीच्या जोरावर सत्तेचा आनंद लुटत आहेत का? मी असे विचारू का? त्यांना लोकांनी निवडून दिले आहे. त्यामुळे आम्ही त्यांचा आदर करता कामा नये का? असे राजकारणात कोणाच्या आई-वडिलांबाबत बोलणे उचित नाही,’ अशी टीका सीतारामन यांनी पत्रकार परिषदेत केली. ‘उदयनिधी यांना पुढे जाण्याची आकांक्षा आहे. तेव्हा त्यांनी त्यांच्या तोंडावर ताबा ठेवला पाहिजे आणि त्यांच्या पदाला शोभतील, असे वक्तव्य केले पाहिजे,’ असेही त्या म्हणाल्या.

हे ही वाचा:

कर्तव्यपथावर बजरंगने ‘पद्मश्री’चा केला त्याग

ब्रिटिशकालिन कायदे बदलले हा ऐतिहासिक क्षण!

डॉ. बालाजी आसेगावकर यांना केशवसृष्टी पुरस्कार

मोस्ट वॉन्टेड दहशतवादी दाऊदच्या जागेचा लिलाव!

‘तमिळनाडूत नुकत्याच उद्भवलेल्या पूरपरिस्थितीत केंद्र सरकारने याआधीच सुमारे ९०० कोटी रुपये राज्य सरकारला दिले आहेत आणि मी हे अजिबातच म्हणत नाहीये की, हा माझ्या बापाचा पैसा आहे किंवा त्यांच्या बापाचा पैसा आहे,’ असेही त्या म्हणाल्या. तर, तामिळनाडूचे अर्थमंत्री थंगम थेन्नारसू यांनी मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी विनंती करूनही निर्मला सीतारामन यांनी निधी देण्यास नकार देऊन संकटात असलेल्या राज्यातील लोकांचा अपमान केल्याची टीका केली आहे.

Exit mobile version