राज्यसभेत मणिपुरवर झालेल्या चर्चेच्या उत्तरात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. त्या म्हणाल्या की, ज्या वेळी केंद्र आणि मणिपूर दोन्ही ठिकाणी काँग्रेसची सत्ता होती, तेव्हा मणिपूरमध्ये शेकडो लोक हिंसाचारात मारले गेले होते. मात्र, त्या वेळी केंद्र सरकारचा कोणताही मंत्री मणिपूरची परिस्थिती पाहण्यासाठी तिथे गेला नाही.
निर्मला सीतारामन यांनी सांगितले की, २००२ ते २०१७ पर्यंत मणिपुरमध्ये काँग्रेसचे सरकार होते. केंद्रातही २०१४ पूर्वी काँग्रेस नेतृत्वाखालील सरकार होते. त्या काळात मणिपुरमध्ये ६२८ बंद झाले होते आणि हिंसाचारामुळे अनेक लोकांचे प्राण गेले. या बंद आणि नाकाबंदीमुळे राज्याच्या तिजोरीला २८२८ कोटी रुपयांचे नुकसान झाले. त्यांनी सांगितले की, २०११ मध्ये १२० दिवस चाललेला सर्वात मोठा आर्थिक बंद झाला होता. त्या काळात जीवनावश्यक वस्तूंचा तीव्र तुटवडा निर्माण झाला होता. पेट्रोलची किंमत २०० रुपये प्रति लिटरवर पोहोचली होती आणि गॅस सिलिंडरची किंमत २००० रुपये झाली होती.
त्या पुढे म्हणाल्या की, आताच्या परिस्थितीत जेव्हा मणिपूरमध्ये तणाव सुरू झाला, तेव्हा केंद्रीय गृहमंत्री सातत्याने राज्याचा दौरा करत राहिले. ते तिथल्या वेगवेगळ्या समुदायांच्या लोकांना भेटले. गृहमंत्री चार दिवस मणिपूरमध्ये राहिले आणि सर्व पीडित व्यक्तींशी चर्चा केली.
हे ही वाचा:
इस्रायलच्या हल्ल्यात हमासच्या सरकार प्रमुखासह अनेक उच्च अधिकारी ठार
‘उद्धव ठाकरे दिल्लीला जाऊन मोदींपुढे लोटांगण घालून आले, नंतर पलटी मारली!’
उत्तर प्रदेश: औरंगजेबाची कबर फोडणाऱ्याला ५ बिघा जमीन, ११ लाख रुपये देणार!
गौतम गंभीर रायपूरमध्ये युवा क्रिकेटपटूंना देणार प्रशिक्षण
अर्थमंत्र्यांनी सांगितले की, आमच्या डबल इंजिन सरकारमधील केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय तब्बल २३ दिवस मणिपूरमध्ये राहिले. मात्र, काँग्रेसच्या काळात जेव्हा हिंसा झाली, तेव्हा केंद्र सरकारकडून कुणीही मणिपूरला गेले नाही. मंगळवारी, राज्यसभेत आपल्या भाषणादरम्यान, विरोधी सदस्यांनी सतत आक्षेप घेतला. तृणमूल काँग्रेसच्या खासदार सुष्मिता देव आणि इतर अनेक खासदारांनी अडथळा आणला. त्यावेळी केंद्रीय अर्थमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या खासदारांमध्ये शाब्दिक चकमकही झाली.
अर्थमंत्री म्हणाल्या की, “हे लोक आपल्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींना दाखवण्यासाठी विरोध करत आहेत.” त्या पुढे म्हणाल्या, “हे संसद आहे, पश्चिम बंगाल किंवा कोलकात्याची एखादी गल्ली नाही जिथे गोंधळ घालायचा, दगडफेक करायची आणि पळून जायचं.”
सीपीएमच्या एका खासदाराने प्रश्न उपस्थित केला की, “मणिपूरमध्ये आधी कधीही अशा प्रकारचा सांप्रदायिक हिंसाचार झाला नव्हता.” यावर अर्थमंत्री उत्तर देताना म्हणाल्या की, “सीपीएमच्या राजवटीत पश्चिम बंगालमध्ये इतिहासातील सर्वात भीषण दंगली झाल्या होत्या. त्रिपुरामध्येही हिंसाचार झाला होता. तसेच केरळमध्येही अशांतता होती. मणिपूरमधील काँग्रेसच्या कारभाराचा उल्लेख करत अर्थमंत्री म्हणाल्या की, “१९९३ मध्ये राजकुमार दोरेंद्र सिंह मणिपुरचे मुख्यमंत्री होते. त्यांच्याच कार्यकाळात कुकी आणि नागा समाजामध्ये मोठा संघर्ष झाला. त्यात ७५० लोकांचा मृत्यू झाला आणि ३५० गावं जाळण्यात आली.
त्या पुढे म्हणाल्या की, “त्या वेळी पंतप्रधान पी.व्ही. नरसिंहराव आणि गृहमंत्री शंकर राव चव्हाण मणिपूरला गेले नाहीत. १९९७-९८ मध्ये इंद्रकुमार गुजराल यांच्या कार्यकाळातही मणिपूरमध्ये हिंसाचार झाला आणि ३५० लोक मारले गेले, पण पंतप्रधान तिथे गेले नाहीत.”