केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी इंडोनेशियाच्या अर्थमंत्री श्री मुल्याणी इंद्रावती यांची भेट घेऊन दोन्ही देशांनी व्यापार आणि गुंतवणूक संबंध अधिक दृढ करण्यावर लक्ष केंद्रित करत ‘आर्थिक संवाद’ सुरू करण्याची घोषणा केली. दोन्ही देश डिजिटल तंत्रज्ञान, मध्यवर्ती बँकांतर्गत पेमेंट सिस्टीम आणि अधिक स्थानिक चलन वापरण्याच्या शक्यतांवर चर्चा करतील, असे सूतोवाच इंद्रावती यांनी केले.
भारत आणि इंडोनेशियामधील ही चलन व्यवस्था यूएई सारखीच असेल. म्हणजे भारतीय निर्यातदार आपला व्यापार इंडोनेशियन रुपियामध्ये करू शकतील तर पामतेलाचा व्यवहार भारतीय रुपयांमध्ये केला जाऊ शकतो, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. इंडोनेशिया हा आसियान क्षेत्रातील भारताचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार आहे आणि आशियातील सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थांपैकी एक आहे.
गेल्या वर्षी इंडोनेशियासह सुमारे ३९ अब्ज अमेरिकी डॉलरचा द्विपक्षीय व्यापार झाला. त्या वर्षी इंडोनेशिया भारताचा सहावा सर्वांत मोठा व्यापारी भागीदार होता. पाम तेल आणि पेट्रोलियम वस्तूंचा यातील वाटा १९ अब्ज अमेरिकी डॉलर होता. पेट्रोलियम उत्पादनांची भारतातून सर्वांत मोठी निर्यात झाली. भारताच्या डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधांमध्ये अन्य देशांकडून लक्षणीय स्वारस्य दाखवले जात आहे. त्यामुळे सिंगापूर, यूएई आणि फ्रान्सनंतर इंडोनेशिया अशा देशांपैकी एक देश असू शकतो, अशी आशा व्यक्त होत आहे.
हे ही वाचा:
सीमा हैदरचा बदला म्हणून पाकिस्तानच्या सिंधमध्ये हिंदू मंदिरावर रॉकेटहल्ला
मराठी गणितज्ञ डॉ. मंगला नारळीकर यांचे निधन
कबड्डीपटू आकाश शिंदे, हरजित कौरचा सन्मान
दहशतवादी संघटनांसाठी काम करणारे जम्मू- काश्मीरमधील तीन अधिकारी बडतर्फ
‘दोन्ही देशांमध्ये द्विपक्षीय गुंतवणूक, वित्तीय सेवा आणि पायाभूत सुविधांचा विकास यांच्यात सहकार्य करार होऊ शकतो. उदाहरणार्थ, भारताने डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधांमध्ये कौशल्य विकसित केले आहे. या सोयीस्कर आणि परवडणाऱ्या डिजिटल पेमेंटच्या यंत्रणेमुळे इंडोनेशियाला आर्थिक उद्दिष्टे साध्य करण्यात मदत होऊ शकते,’ असा विश्वास सीतारामन यांनी व्यक्त केला.