शिवसेनेमध्ये उभी फूट पडल्याने शिवसेना आणि माहाविकास आघाडी सरकारला मोठा धक्का बसला आहे. शिवसेना नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेच्या आमदारांनी बंड पुकारला आहे. शिंदे गटाकडून ३९ आमदार असल्याचा दावा करण्यात आला आहे. शिवसेनेचे मंत्रीही शिंदे गटात सामील झाले आहेत. यावरून भाजपा नेते निलेश राणे यांनी शिवसेनेला टोला लगावला आहे.
“एकनाथ शिंदेंसोबत इतके आमदार निघून गेले आहेत की उद्धव ठाकरेंनी आता स्वतःच्या गटाचं नाव “शिवसेना” ऐवजी “शिल्लक सेना” करून घ्यावं,” असा खोचक सल्ला निलेश राणे यांनी लगावला आहे.
एकनाथ शिंदे यांनी विधान परिषद निवडणुकांच्या निकालानंतर बंड पुकारले होते. त्यावेळी त्यांच्यासोबत १३ आमदार होते. मात्र, त्यानंतर ही संख्या वाढत गेली आणि शिवसेना नेते दीपक केसरकर यांनी त्यांच्यासोबत आता ३९ शिवसेनेचे आमदार असून १२ अपक्ष आमदार आहेत, अशी माहिती दिली आहे.
शिवसेना नेते उदय सामंत हे ही काल गुवाहाटीला दाखल झाले. उदय सामंत हे आदित्य ठाकरेंचे जवळचे मानले जायचे. त्यामुळे ते शिंदे गटात सामील झाल्यामुळे शिवसेनेला हा मोठा धक्का मानला जात आहे.
हे ही वाचा:
मुडदे येतील… यावरून संजय राऊत लक्ष्य
अयोध्येच्या निर्मली कुंड चौक परिसरात आढळले हातबॉम्ब
“आदित्य ठाकरे राऊतांसारखं बोलायला लागले तर भविष्य वाईट”
“शिवसेना पक्ष प्रमुखांना राऊतांसारखा प्रवक्ता चालतो का?”
बंडखोर आमदारांपैकी १६ आमदारांवर अपात्रतेची कारवाई केल्याविरोधात एकनाथ शिंदे गटाने सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले आहेत. त्याशिवाय, शिंदे यांच्याव्यतिरिक्त कोणत्याही आमदाराला शिवसेना गटनेतेपदी नियुक्त अथवा प्रतोद बनविण्याविरोधातही आव्हान दिले आहे. विधानसभा उपाध्यक्षांच्या अधिकारात हस्तक्षेप केल्याचा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला आहे. महाराष्ट्रातील आमदारांच्या बंडाचा मुद्दा आता थेट सर्वोच्च न्यायालयात पोहोचला आहे.