एन्काऊंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा यांच्या घरावर एनआयएचे छापे

एन्काऊंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा यांच्या घरावर एनआयएचे छापे

एन्काऊंटर स्पेशलिस्ट म्हणून प्रसिद्ध असणारे माजी पोलिस अधिकारी प्रदीप शर्मा यांच्या घरावर राष्ट्रीय तपास यंत्रणेने छापे घातले आहेत. शर्मा यांच्या अंधेरी येथील निवासस्थानी ही झाडाझडती सुरू आहे. तर त्यासोबतच प्रदीप शर्मा यांची चौकशीही राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या मार्फत केली जात आहे. अँटिलिया बॉम्ब प्रकरण आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरण यांच्याशी संबंधित हा तपास सुरू आहे.

गुरुवार, १७ जून रोजी सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास राष्ट्रीय तपास यंत्रणेचे पथक माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांच्या अंधेरी येथील निवासस्थानी दाखल झाले. चार तास उलटून गेले तरी हा तपास सुरू आहे. तर शर्मा यांची चौकशीही केली जात असल्याची माहिती मिळत आहे. अँटिलिया स्फोटक प्रकरण आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणाशी संबंधित हा तपास सुरू आहे. यावेळी राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या अधिकाऱ्यांसोबतच मुंबई पोलीस दलाचे पथक आणि केंद्रीय राखीव पोलीस दलाचे पथकही हजर आहे. ही सारी तयारी बघता शर्मा यांनाही मनसुख हिरेन प्रकरणात अटक होणार का? अशी शंका उपस्थित होत आहे.

हे ही वाचा :

शिवसेनेने आता सामना बंद करून बाबरनामा काढावा

शिवसेना भवनावर भाजपा युवा मोर्चाचा “फटकार मोर्चा”

शिवसेनेने दाखवली औरंगजेबी वृत्ती

राम मंदिर उभारणीत कोलदांडा घालणाऱ्या शिवसेनेला ‘फटकार’

प्रदिप शर्मांविरोधात पुरावे?

या प्रकरणात शर्मा यांची या आधी दोनदा चौकशी झाली असून मुंबई येथील राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या कार्यालयात त्यांची चौकशी करण्यात आली होती. पण त्यांच्या विरोधात काही ठोस पुरावे सापडले नसल्यामुळे त्यांना या प्रकरणात आरोपी करण्यात आले नव्हते. पण दोन दिवसांपूर्वी या प्रकरणात संतोष शेलार आणि आनंद जाधव या दोन जणांना अटक करण्यात आली असून या दोघांचेही प्रदिप शर्मा यांच्याशी कनेक्शन असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे या दोघांच्या चौकशीतून यंत्रणेला शर्मा यांच्या विरोधात काही माहिती मिळाली आहे का? असा सवाल उपस्थित होत आहे.

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया घराबाहेर सापडलेली स्फोटके आणि मनसुख हिरेन यांची हत्या या दोन घटनांनी महाराष्ट्र हादरून गेला होता या प्रकरणात बडतर्फ पोलिस अधिकारी सचिन वाझे हा मुख्य आरोपी असून त्याच्यासोबत इतर काही जणांना अटक करण्यात आली आहे. प्रदीप शर्मा आणि सचिन वाझे यांचे जवळचा संबंध असून ते पोलीस खात्यात एकत्र कार्यरत होते. तर त्यानंतर ते दोघेही शिवसेना पक्षातही कार्यरत होते. शर्मा यांनी शिवसेनेतर्फे नालासोपारा येथून निवडणूक लढवली होती तर सचिन वाझे हा शिवसेनेचा प्रवक्ता म्हणून कार्यरत होता.

Exit mobile version