सिटी बँक गैरव्यवहार प्रकरणी आनंद अडसूळ यांना दिलासा नाही

सिटी बँक गैरव्यवहार प्रकरणी आनंद अडसूळ यांना दिलासा नाही

सिटी बँक गैरव्यवहार प्रकरणात ईडीने तपास सुरू केल्यामुळे शिवसेनेचे माजी खासदार आनंद अडसूळ अडचणीत आले आहेत. अडसूळ यांनी या प्रकरणाबाबत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र, उच्च न्यायालयाने त्यांना तातडीने दिलासा देण्यास नकार दिला आहे. आनंदराव अडसूळ सिटी बँकेचे अध्यक्ष असताना त्यांच्या कार्यकाळात बँकेत ९०० कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप आहे. हा आरोप आमदार रवी राणा यांनी केला होता.

राणा यांनी केलेल्या तक्रारीनंतर ईडीने या प्रकरणाची दखल घेत त्यांच्या घरावर आणि कार्यालयांवर धाडी टाकल्या होत्या. मात्र, चौकशीदरम्यान अडसूळ यांची तब्येत अचानक बिघडल्यामुळे गोरेगावमधील एका खासगी रुग्णालयात त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले.

हे ही वाचा:

‘लोकांना सांगा मी क्रांतिकारी होतो’… सरदार उधम चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

‘डी’ गँगचे कारनामे उघडकीस आणण्यासाठी एनसीबी तत्पर

मुख्य सचिव कुंटे आणि पोलिस महासंचालक संजय पांडेंना सीबीआयचे बोलावणे

शशी थरूरदेखील सिब्बल यांच्या समर्थनार्थ मैदानात

अडसूळ यांनी याचिकेत म्हटले आहे की, त्यांच्याविरोधात मनमानी पद्धतीने कारवाई करण्यात आलेली आहे. त्यांनी अमरावतीच्या खासदार नवनीत कौर राणा यांच्या जात प्रमाणपत्राच्या वैधतेला उच्च न्यायालयात आव्हान दिले आणि त्यामुळे न्यायालयाने त्यांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरवून रद्द केले. त्यामुळे राजकीय सुडापोटी ही कारवाई करण्यात आलेली आहे. या प्रकरणाशी माझा काहीही संबंध नसून तूर्तास दिलासा देण्यात यावा, अशी मागणी अडसूळ यांच्या वतीने अ‍ॅड. अभिनव चंद्रचूड यांनी केली.

ईडीच्या वतीने अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंह यांनी या याचिकेला विरोध केला. निवडणुकीशी या प्रकरणाचा संबंध नसून चौकशीदरम्यान प्रकृती बिघडल्याचे कारण दिल्यास तपास यंत्रणा चौकशी कशी करणार असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. न्या. एस. एस. शिंदे आणि न्या. एन. जे. जमादार यांच्या खंडपीठाने शुक्रवारी याचिकेवर सुनावणी निश्चित केली आहे. तसेच अडसूळ यांचा वैद्यकीय अहवाल दाखल करण्याचे निर्देश रुग्णालयाला देण्यात आले आहेत. सुनावणीपूर्वी कोणताही दिलासा देण्यास न्यायालयाने नकार दिला आहे.

 

Exit mobile version