‘शिवरायांचा आठवावा प्रताप’ हा दिवाळी अंक म्हणजे शिवकाळाचा अमूल्य दस्तावेज

संपादक दिनेश कानजी यांनी काढले उद्गार

‘शिवरायांचा आठवावा प्रताप’ हा दिवाळी अंक म्हणजे शिवकाळाचा अमूल्य दस्तावेज

यंदा हिंदवी स्वराज अभियान न्यूज डंकाने हाती घेतले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने यावर्षी विजयादशमीला १००व्या वर्षात पदार्पण केले आणि दुसरी महत्त्वाची घटना म्हणजे हे शिवराज्याभिषेकाचे ३५१ वे वर्ष आहे. या अभियानाच्या माध्यमातून अनेक इतिहास अभ्यासक, संशोधक यांच्या लेखणीतून न्यूज डंकाचा दसरा दिवाळी अंक ‘शिवरायांचा आठवावा प्रताप’ची निर्मिती झाली, त्यातून शिवकाल उलगडला. हा अंक म्हणजे शिवकालिन इतिहासाचा एक अमूल्य असा दस्तावेज आहे, अशा शब्दांत ‘न्यूज डंका’चे संपादक दिनेश कानजी यांनी या दसरा दिवाळी अंकाबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या.

स्वराज्याची राजधानी किल्ले रायगडावर या अंकाचा प्रकाशन सोहळा थाटात पार पडल्यानंतर कानजी यांनी या अंकाच्या निर्मितीविषयीची भावना प्रकट केली. ते म्हणाले की, प्रख्यात इतिहास संशोधक पांड़ुरंग बलकवडे यांच्यासारख्या जाणकारांनी आमच्या या दिवाळी अंकात लेखन करून शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वाचा भलामोठा कॅनव्हास मांडला आहे. सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचे वंशज विक्रमसिंह मोहिते, सरखेल कान्होजी आंग्रे यांचे वंशज इतिहास अभ्यासक रघुजीराजे आंग्रे यांच्या इतिहास अभ्यासाची चुणूक अंकातून दिसून येते. शिवकाल आणि खगोलशास्त्र यांचा अन्योन्यसंबंधही या अंकात मांडण्यात आला आहे. शिवकालिन पत्रांतून डॉ. अनुराधा कुलकर्णी यांनी शिवरायांची भव्य प्रतिमा आपल्यासमोर उभी केली आहे. शिवराय आणि समर्थ रामदास यांच्यातील एक अनोखे नाते यानिमित्ताने कौस्तुभ कस्तुरे यांनी आपल्या समोर आणले आहे, असे सांगून कानजी म्हणाले की, हे सगळे लेख सखोल अभ्यासातून आलेले आहेत. ज्यांनी २५-३० वर्षे इतिहासाचा अत्यंत बारकाईने अभ्यास केला आहे, त्यांनी या अंकासाठी योगदान दिले आहे, ही आमच्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. त्यामुळेच हा अंक प्रत्येकाने संग्रही ठेवावा असाच झाला आहे. अनेक दिवाळी अंक आपण वाचतो, पण नंतर त्याचे काय होते हे माहीत नसते. मात्र शिवइतिहासावरील हा अंक प्रत्येकाने संग्रही ठेवण्यासारखा आहे.

दिनेश कानजी म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज हे प्रत्येकाच्या हृदयात आहेत. ते अवघ्या हिंदुस्थानाचे महादेव आहेत. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण म्हणाले होते की, छत्रपती झाले नसते तर पाकिस्तानाच्या सीमा मुंबईपर्यंत आल्या असत्या. आम्ही शिवाजी महाराजांचे मावळे आहोत आणि त्याच भक्तिभावाने रायगडावर आलो आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या साक्षीने अंकाचे प्रकाशन व्हावे, ही आमची इच्छा होती, ती इच्छा पूर्ण झाली आहे. हा सोहळा संस्मरणीय ठरला आहे. आमच्या आयुष्यात प्रकाशनाचा हा सोहळा कायमचा हृदयात कोरला जाईल. जे हा अंक संग्रही ठेवतील त्यांना १० वर्षानंतरही आपल्याला या अंकातून नवे काही गवसले असेच वाटेल. म्हणूनच हा अंक जरूर विकत घ्या.

हे ही वाचा:

श्रद्धा निर्मूलन ते भाजपा निर्मूलन; एक मानवी प्रवास

‘शिवरायांचा आठवावा प्रताप’… ‘न्यूज डंका’च्या दसरा दिवाळी अंकाचे रायगडावर थाटात प्रकाशन

झाकीर नाईक भारतातून पळालेला नमुना…पाकिस्तानी पत्रकाराने काढली लायकी

बहराइच हत्येतील आरोपी सर्फराज, तालिबला पायावर मारल्या गोळ्या

कानजी यांनी सांगितले की, दरवर्षी न्यूज डंकाचा दसरा दिवाळी अंक प्रकाशित केला जातो. हा अंक नेहमीच एका विषयाला वाहिलेला असतो. भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण झाली त्यानिमित्ताने अमृतकाल या विषयावर आपण अंक काढलेला आहे. मोदींच्या कारकीर्दीला २० वर्षे झाली त्यावरही आम्ही अंक प्रकाशित केला होता. हे वर्ष छत्रपतींच्या राज्याभिषेकाचे ३५१ वे वर्ष आहे. या घटनेमुळे हिंदुस्थानच्या इतिहासाला कलाटणी मिळाली. या राज्याभिषेकाच्या संदर्भात अनेक प्रकारची माहिती समोर यावी असा उद्देश होता. या अंकाचे प्रकाशन कुठे करावे असा विचार जेव्हा मनात आला, तेव्हा किल्ले रायगडाशिवाय दुसरे नाव समोर आले नाही. शिवछत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीत हे प्रकाशन व्हावे असे वाटणे स्वाभाविक आहे.

न्यूज डंकासाठी ही खूप मोठी घटना आहे. न्यूज डंकाने या अंकाच्या माध्यमातून जे डॉक्युमेंटेशन केले आहे, त्यातून शिवकालिन इतिहासाचा हा उत्तम दस्तावेज तयार झाला आहे, याचा आनंद आहे, असेही कानजी म्हणाले.

Exit mobile version