नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधी ठरला

नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधी ठरला

मंगळवारी राजभवनवर होणार सोहळा

महाराष्ट्रातील मंत्रिमंडळ विस्ताराला अखेर मंगळवार ९ ऑगस्टचा मुहूर्त मिळाला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या झालेल्या बैठकीनंतर अखेर मंत्रिमंडळ विस्तार मंगळवारी होणार हे स्पष्ट झाले आहे. सकाळी ११ वाजता राजभवन येथे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी नव्या मंत्र्यांना शपथ देतील. या मंत्रिमंडळात या पहिल्या टप्प्यात १८ मंत्री असतील अशी शक्यता वर्तविली जात आहे.

सोमवारी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांची सरकारी बंगला नंदनवन येथे अडीच तास बैठक झाली. त्यात या मंत्रिमंडळाविषयी चर्चा झाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपापल्या पदांची शपथ ३० जून रोजी घेतली होती. त्यानंतर मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा सुरू होती. दिल्लीतही यासंदर्भात चर्चा झाल्या होत्या. लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होईल, असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून दिले जात होते. अखेर त्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.

राजभवनने दिलेल्या माहितीनुसार ११ वाजता राजभवनच्या दरबार हॉलमध्ये राज्यपाल भगतसिंह कोश्यारी नव्या मंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ देतील. पण ज्यांना मंत्रिपदे देण्यात येणार आहेत, त्यांची नावे अद्याप उघड झालेली नाहीत. चर्चा मात्र विविध नावांची सुरू आहे.

सुत्रांच्या म्हणण्याप्रमाणे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, सुधीर मुनगंटीवार, राधाकृष्ण विखे पाटील, प्रवीण दरेकर तसेच अपक्ष आमदार रवी राणा हे मंत्री होऊ शकतात. शिंदे गटात दीपक केसरकर, गुलाबराव पाटील, उदय सामंत, दादाजी भुसे, शंभूराजे देसाई, संजय शिरसाट यांनाही मंत्रिपद मिळू शकेल, अशी चर्चा आहे.

हे ही वाचा:

धनखड कणखर हिंदुत्ववादी

टीईटी घोटाळा प्रकरणात मनी लॉंड्रिंग

पी व्ही सिंधूची ‘सुवर्ण’ कामगिरी, राष्ट्रकुल स्पर्धेच्या टेबलमध्ये भारताची चौथ्या स्थानी मुसंडी

पालघरमध्ये ख्रिस्ती मिशनऱ्यांनी घरात घुसून केला धर्मांतरणाचा प्रयत्न

 

१७ ते २३ ऑगस्ट या कालावधीत विधिमंडळाचे पावसाळी सत्र होणार आहे. विधिमंडळ सचिवालयाचे अतिरिक्त सचिव सुभाष नलावडे यांनी विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन १० ऑगस्टपासून प्रस्तावित आहे असे म्हटले आहे. ९ ते १८ ऑगस्ट या कालावधीत सुट्टीवर गेलेल्या विधिमंडळातील सरकारी कर्मचाऱ्यांच्या सुट्टयाही रद्द करण्यात आल्या आहेत.

Exit mobile version