गेहलोत सरकारच्या नव्या मंत्र्यांचा शपथविधी! ‘या’ मंत्र्यांनी घेतली शपथ

गेहलोत सरकारच्या नव्या मंत्र्यांचा शपथविधी! ‘या’ मंत्र्यांनी घेतली शपथ

राजस्थान मधील काँग्रेस पक्षाचा मंत्रिमंडळ बद्दल पूर्ण झाला आहे. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या सरकारमधील मंत्री म्हणून या पंधरा आमदारांनी शपथ घेतली आहे. यामध्ये ११ कॅबिनेट मंत्री आहेत. तर चार जणांनी राज्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे.

रविवार, २१ नोव्हेंबर रोजी राजस्थान मधील काँग्रेस मंत्रीमंडळाचा शपथविधी पार पडला. जयपूर येथील राजभवनात हा शपथ ग्रहण समारोह पार पडला. यावेळी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि काँग्रेस पक्षाचे राजस्थान प्रभारी अजय माकन हे उपस्थित होते. राजस्थानचे राज्यपाल कालराज मिश्रा यांनी या सर्व मंत्र्यांना शपथ दिली आहे.

यामध्ये हेमाराम चौधरी, महेंद्रजीत सिंह मालवीय, रामलाल जाट, महेश जोशी, विश्र्वेंद्र सिंह, रमेश मीणा, ममता भूपेश बैरवा, भजनलाल जाटव, टिकाराम जुली, गोविंदराम मेघवाल आणि शकुंतला रावत या अकरा जणांनी कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली आहे. तर बृजेन्‍द्र सिंह ओला, राजेंद्र गुढा, मुरारी लाल मीणा आणि जाहिदा यांनी राज्यमंत्री म्हणून शपथ ग्रहण केली.

हे ही वाचा:

ब्लॅक कॅप्सना भारत व्हाईट वॉश देणार?

हिंदुत्ववादी कार्यकर्ते जाणीवपूर्वक टार्गेट

योगींच्या खांद्यावर मोदींचा हात, सर्वत्र फक्त त्याचीच बात!

अमेरिकेत राष्ट्रपती पदाची सूत्रे उपराष्ट्रपतींकडे सोपवू शकतात मग महाराष्ट्रात का नाही?

राजस्थान मध्ये २०२३ साली निवडणुका होऊ घातल्या असून त्या पार्श्वभूमीवर हा मंत्रिमंडळ बदल महत्त्वाचा मानला जात आहे. तर २०२३ मध्ये काँग्रेस पक्ष पुन्हा एकदा राजस्थानमध्ये सत्ता स्थापन करेल असा विश्वास मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी व्यक्त केला आहे.

शनिवार, २० नोव्हेंबर रोजी कॉंग्रेसशासित राजस्थान सरकार मधील सर्व मंत्र्यांनी राजीनामे दिले होते. मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्याकडे हे राजीनामे सुपूर्त करण्यात आले होते. राजस्थानमध्ये मंत्रिमंडळ बदलाच्या चर्चा जोर धरत असतानाच सर्व मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांकडे राजीनामे सादर केल्यामुळे राजस्थान सरकार मध्ये आता काय नवे पाहायला मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. त्यानुसार आता राजस्थानला नवे मंत्रिमंडळ मिळाले आहे.

Exit mobile version