दोन शुन्यांची बेरीज

दोन शुन्यांची बेरीज

दोन दिवसांपूर्वी कन्हैया कुमार याने कॉंग्रेस पक्षात अधिकृत प्रवेश केला. काँग्रेस पक्षाचे नेते राष्ट्रीय उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या उपस्थित हा पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी कन्हैयाचा खास मित्र जिग्नेश मेवाणी हा देखील उपस्थित होता. जिग्नेश देखील लवकरच काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याचे म्हटले जात आहे. आजवर ज्या कन्हैया कुमार, जिग्नेश मेवाणी सारख्यांना काँग्रेसची बी टीम म्हटले गेले ते आता अधिकृतपणे काँग्रेसवासी होताना दिसत आहेत. पण राजकारणात असे पक्ष प्रवेश जेव्हा होतात तेव्हा राजकीय फायदा तोट्याचे गणित मांडणे क्रमप्राप्त असते. शंभर गाढवांच्या कळपात आणखी एक गाढव सामील झाल्याने त्या कळपाची संख्या एकने नक्की वाढते. पण गुणात्मक वाढ काही होत नसते. तसाच हा प्रकार आहे.

एका घाट्यात असणाऱ्या कंपनीचे तितकेच कामचुकार आणि अकार्यक्षम कर्मचारी दुसऱ्या घाट्यात असणाऱ्या कंपनीत दाखल झाले म्हणून ती नवी कंपनी फायद्यात येईल का? कन्हैया, जिग्नेशचा काँग्रेस प्रवेश हा यापेक्षा काही वेगळा नाही. या सारख्यांच्या पक्ष प्रवेशाने जर काँग्रेसला फायदा होईल असे कोणाला वाटत असेल तर तो माणूस काँग्रेस डुबवण्यासाठी पोटतिडकीने काम करतोय असेच म्हणावे लागेल.

कन्हैया कुमार नावाचा फुगा केव्हाच फुटलेला आहे. २०१९ साली लोकसभा निवडणुकीत तब्बल सव्वा चार लाख मतांनी पराभूत झाला होता. त्याचे जन्मगाव असलेल्या बेगुसरायच्या लोकांनीच त्याला नाकारले आहे. अशा सर्व नाकर्त्यांना घेऊन काँग्रेस नेमके काय साध्य करू पहात आहे याचे उत्तर केवळ राहुल गांधींनाच माहिती. हार्दिक पटेलला काँग्रेसने अशाच प्रकारे घेतले. पण त्याचा उपयोग काय झाला?

कन्हैयाने काँग्रेस पक्षात प्रवेश करताना आपली भूमिका मांडली. त्यावेळी ‘देशातील लोकशाही टिकवायची असेल तर काँग्रेस पक्ष टिकणे महत्वाचे आहे’ अशा पद्धतीची प्रतिक्रिया त्याने दिली. या त्याच्या प्रतिक्रियेतून त्याने दोन गोष्टींची अप्रत्यक्ष कबूली दिली असेच म्हणावे लागेल.

पहिली कबूली म्हणजे डावे पक्ष असताना लोकशाही टिकणे आणि डाव्या पक्षात राहुन लोकशाही टिकवणे शक्य नाही. कारण असे असते तर त्याला पक्ष बदलायची वेळ आली नसती. आता एका परिवारची ‘प्रायव्हेट लिमिटेड कंपनी’ असणाऱ्या पक्षात जाऊन लोकशाही कशी टिकणारे हे कन्हैयालाच ठाऊक.

हे ही वाचा:

महाराष्ट्र मॉडेलमध्ये कोविड योद्धे संपावर

‘लोकांना सांगा मी क्रांतिकारी होतो’… सरदार उधम चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

‘डी’ गँगचे कारनामे उघडकीस आणण्यासाठी एनसीबी तत्पर

मुख्य सचिव कुंटे आणि पोलिस महासंचालक संजय पांडेंना सीबीआयचे बोलावणे

कन्हैयाने दिलेली दुसरी कबुली म्हणजे त्याचे भारतीय संविधान, भारतीय लोकशाही, भारताची लोकशाहीवादी परंपरा या विषयीचे अज्ञान त्याने जगासमोर खुले केले. कारण भारतातील लोकशाही टिकणे आणि टिकवणे हे कोणा एका पक्षावर किंवा परिवार अवलंबून नाही. ती टिकण्यामध्ये या देशाची मुळ लोकशाही धार्जिणी संस्कृती आणि लोकशाहीवादी नागरिक यांची भूमिका मोलाची आहे. पण डाव्या कळपात राहिलेल्या, वाढलेल्या, शिकलेल्या कन्हैयाला हे कळू शकतच नाही.

कन्हैयाचे काँग्रेस पक्षात प्रवेश करणे हे भाजपा पुढली अनेक वर्ष सत्तेत राहणारे याचेच एक द्योतक मानावे लागेल. गेल्या अनेक वर्षांचा भारताचा राजकीय इतिहास जर उलगडून पाहिला, तर काँग्रेस आणि डावे यांच्यात एक अप्रत्यक्ष करार होता. काँग्रेसने सत्ता भोगावी आणि डाव्यांनी त्या सत्तेच्या अनुषंगाने येणाऱ्या लाभाच्या पदांवर डल्ला मारावा. मग यामध्ये विद्यापिठे, माध्यमे, विवीध सरकारी समित्या, अशा बऱ्याच गोष्टी समाविष्ट होत्या. नरेंद्र मोदी सत्तेत आल्यावर डाव्यांच्या या सर्व ऐशो आरामावर बोळा फिरला. डाव्यांची ही सर्व दुकाने मोदींनी बंद करून टाकली आहेत. अशा परिस्थितीत कन्हैया कुमारकडे राजकारणात आपले नशीब अजमावण्या शिवाय दुसरा पर्याय उरलाच नव्हता. कारण जेएनयुमधून घेतलेली पिएचडी डिगरी असली तरी सर्वसामान्यांसारखे कष्ट करून उदरनिर्वाह करणे त्याला कुठून जमायचे? म्हणून मग राजकारण हाच एक पर्याय.

अशा वेळी मग डावे विचार, मार्क्सचे तत्वज्ञान या सगळ्या गोष्टी बासनात गुंडाळून ठेवल्या जातात. मार्क्सने सांगितलेली ‘डिक्टेटरशिप ऑफ प्रोलिटरेट’ ही योग्य वाटू लागते. म्हणूनच कन्हैयाने गांधी कुटूंबाची जी हुजूरी करणे हसत हसत स्विकारले आहे. कारण त्यातून होणारा वैय्यक्तीक फायदा हा मार्क्सच्या नावे झोळी घेऊन डफल्या वाजवत फिरताना मिळत नसतो. संपत्तीवर समाजाचा अधिकार वगरे तत्वज्ञान मांडताना स्वखर्चाने पक्ष कार्यालयात बसवलेल्या ‘एसी’ वरील मालकी देखील सोडवत नाही हेच डाव्यांच्या ढोंगबाजीचे वास्तव आहे.

त्यामुळेच कम्युनिस्ट पक्षाला सोडटिठ्ठी देत. काँग्रेस पक्षाच्या वळचणीला जाऊन बसणे कन्हैयासाठी फारसे अडचणीचे ठरले नसावे. वासरात लंगडी गाय शहाणीच वाटते. त्यामुळे कम्युनिस्ट पक्षापेक्षा बऱ्या स्थितीत असलेल्या काँग्रेस पक्षाला निवडण्यात फार अडचण आली नसावी. त्यात काँग्रेसचे नेतृत्व राहुल गांधी करत असल्यामुळे कन्हैयाच्या ‘विद्वत्तेला’ पक्षात फारच वाव मिळण्याची शक्यता आहे. पण या पलीकडे ना काँग्रेसला कन्हैयाचा फायदा होणार, ना कन्हैयाला काँग्रेसचा. दोन शुन्यांची बेरीज शुन्यच असते.

Exit mobile version