“पक्षश्रेष्ठींनी संजय राऊत यांना बळीचा बकरा केलं”

विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांची उद्धव ठाकरेंवर टीका

“पक्षश्रेष्ठींनी संजय राऊत यांना बळीचा बकरा केलं”

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेच्या नेत्या आणि विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली आहे. पक्षश्रेष्ठींनी संजय राऊत यांच्याकडून हवं तसं बोलून घेत त्यांचा बळीचा बकरा केल्याचा आरोप नीलम गोऱ्हे यांनी केला आहे. नागपुरात प्रेस क्लबनं आयोजित केलेल्या ‘मीट द प्रेस’मध्ये नीलम गोऱ्हे बोलत होत्या.

उद्धव ठाकरे हे आजारी पडल्यानंतर पक्षात काय सुरू आहे, हे कळत नव्हते. आमदारांना निधीही दिला जात नव्हता. पक्षश्रेष्ठी यांना जे हवं होतं, ते संजय राऊतांकडून बोलून घेत होते. राऊत टोकाची भूमिका घेतात त्यावर अनेकदा आक्षेपही नोंदविला होता. शिवाय त्यांना सल्लाही दिला होता. आक्रमक बोलण्यापेक्षा वैचारिक मतभेद वेगळ्या पद्धतीनंही मांडता येतात. मात्र, त्यांनी ऐकलं नाही. या प्रकरणात त्यांना बळीचा बकरा बनवण्यात आलं आहे, अशी टीका नीलम गोऱ्हे यांनी केली आहे.

विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे बोलताना म्हणाल्या की, “महाविकास आघाडी सरकारच्या काळात उद्धव ठाकरे आजारी पडले आणि त्यावेळी तब्बल दोन ते तीन आठवड्यांसाठी सर्वांचा संवाद थांबला. त्या मधल्या काळात पक्षात नेमकं काय सुरू आहे, नेमकं कोण काय करतंय? अशा बऱ्याच गोष्टी कळेनाशा झाल्या. आमदारांना निधी दिला जात नव्हता, यावरुन त्यांची नाराजी होतीच. तसेच, त्यांची दखल कोणीच घेत नाही. सगळंच विस्कळीत होतं.”

हे ही वाचा:

ज्युनिअर मेहमूद यांची कॅन्सरशी झुंज अपयशी

नवाब मलिक महायुतीत नको!

नो वन किल्ड दिशा…

केसीआर यांना धोबीपछाड देणाऱ्या काँग्रेसच्या रेवंथ रेड्डींनी घेतली मुख्यमंत्री पदाची शपथ

“आपण स्वतः संजय राऊतांशी बोललो होतो. आता त्यांना आठवतंय की, नाही माहीत नाही. त्यांच्याबाबत आदरच होता मनात, तेव्हाही होता आणि आजही आहे. मतभेद आहेत, वैचारिक मतभेद आहेत, त्यांचे काही शब्द पटत नाहीत. त्यांना म्हटलं की, राऊत तुम्ही आत्ताच जेलमधून आला आहात. एवढी टोकाची भूमिका घेत आहात. त्याऐवजी जरा थोडसं शांतपणे बोला. १०० टक्के आक्रमक बोलण्यापेक्षा, वैचारिक मतभेद वेगळ्या पद्धतीनं मांडले जातात. तसं तुम्ही विचार करा याबाबत. यावर ते मला म्हणाले की, माझं आयुष्य मी समर्पित केलेलं आहे आणि मी असाच बोलणार. आता त्यांनीच असं बोलल्यावर पुढे काय बोलणार. शेवटी असं आहे की, आपण सांगण्याचं काम करू शकतो. त्यांचं बोलणं पक्षश्रेष्ठींना आवडणारं होतं, पटणारं होतं. पक्षश्रेष्ठींना स्वतः जे बोलायचं होतं, ते त्यांच्याकडून बोलून घेत होते. त्यामुळे त्यांना पक्षानं बळीचा बकरा केलं, असं माझं मत आहे,” अशी टीका नीलम गोऱ्हे यांनी उद्धव ठाकरेंवर नाव न घेता केली.

Exit mobile version