गाझामधील समस्येवर कायमस्वरूपी तोडगा हवा!

परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे प्रतिपादन

गाझामधील समस्येवर कायमस्वरूपी तोडगा हवा!

परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी गाझामधील मानवतावादी संकटावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याच्या आवश्यकतेवर जोर देतानाच इस्रायल-हमासमधील संघर्षाचा मुद्दा गंभीर असल्याचे सांगितले. ते युगांडाची राजधानी कंपाला येथे १९व्या नाम शिखर संमेलनात बोलत होते.

‘सध्या अशा प्रकारचे संघर्ष सुरू आहेत, ज्याचे पडसाद दूरदूरवर उमटत आहेत. विशेषतः गाझा शहर आमच्या चिंतेचे प्रमुख कारण आहे. या मानवतावादी संकटावर कायमस्वरूपी तोडग्याची आवश्यकता आहे, जो सर्वाधिक होरपळणाऱ्या नागरिकांना त्वरित दिलासा देईल. मात्र दहशतवाद आणि नागरिकांना ओलीस ठेवणे अस्वीकारार्ह आहे, हेदेखील लक्षात घेतले पाहिजे,’ असे जयशंकर यावेळी म्हणाले.

हे ही वाचा:

राम मंदिराबद्दलची काँग्रेसची भूमिका उदासीन, गुजरातच्या काँग्रेस आमदाराचा राजीनामा

अमेरिकेचा येमेनमधील हुती दहशतवाद्यांच्या तळावर हल्ला

आयपीएल आता ‘टाटां’ची

चेहऱ्यावर मनमोहक हास्य, कपाळावर टिळा अन हातात धनुष्यबाण!

जयशंकर यांनी यावेळी मानवतावादी कायद्याच्या अंमलबजावणीचे महत्त्व अधोरेखित केले. सर्व देशांना आंतरराष्ट्रीय मानवतावादी कायद्याचा नेहमीच सन्मान केला पाहिजे. गाझा संघर्ष अजून वाढण्यापासून रोखले पाहिजे. अंतिम निष्कर्षासाठी द्विराष्ट्र तोडग्याच्या दिशेने कार्य केले पाहिजे, जिथे पॅलिस्टिनी नागरिक सुरक्षित सीमेच्या आत राहू शकतील. हे यश सामूहिक प्रयत्नांनी साध्य होईल, त्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे, असे जयशंकर म्हणाले.

जयशंकर यांनी ‘वसुधैव कुटुंबकम’ म्हणजेच अवघ्या जगाला एक कुटुंब मानणाऱ्या भारताच्या प्राचीन विश्वासाने प्रेरित दृष्टिकोन संमेलनात सादर केला. तसेच, करोना साथीने आपल्या सर्वांनाच पूर्ण नामोहरम केले. त्याच्या जखमा भरण्यासाठी अनेक पिढ्या जाव्या लागतील, असेही ते म्हणाले.शिखर परिषदेत जयशंकर यांनी नेपाळचे पंतप्रधान पुष्पकुमार दहल उर्फ प्रचंड यांची भेट घेतली. तसेच, बोलीविया, अजरबैजान आणि व्हेनेझुएला यांच्या समकक्ष अधिकाऱ्यांसह बैठक घेतली. या बैठकीत द्विपक्षीयसह अन्य मुद्द्यांवर चर्चा झाली.

Exit mobile version