लोकसभा निवडणुकीचे निकाल ४ जून रोजी घोषित झाल्यानंतर त्यात राष्ट्रीय लोकशाही आघाडी तथा एनडीएने तिसऱ्यांदा बहुमत मिळविले. जवळपास २९० जागी भारतीय जनता पार्टीप्रणित एनडीएने विजय मिळविला. बहुमतासाठी २७२ जागांची आवश्यकता असताना एनडीएने हे बहुमत प्राप्त केले. अर्थात, भाजपाला एक पक्ष म्हणून जे बहुमत अपेक्षित होते ते मिळू शकले नाही. शिवाय, एनडीएलाही यापेक्षा अधिक बहुमताची अपेक्षा होती ती पूर्ण होऊ शकली नाही. आता पुन्हा सरकार स्थापन करण्याच्या उद्देशाने एनडीएची बैठक मंगळवारी आयोजित करण्यात आली असून त्यात भाजपासोबतचे सर्व मित्र पक्ष सहभागी होणार आहेत.
भाजपाला उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, या राज्यांत प्रामुख्याने फटका बसला. मात्र भाजपाने बाकी राज्यांत दमदार कामगिरी करत घोडदौड केली. तिकडे इंडी आघाडीला २३४ जागी यश मिळाले. त्यात काँग्रेसने १०० जागा मिळविल्या.
मोदींची विजयाची हॅट्ट्रिक
भारतीय जनता पार्टीचे नेते आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच पुन्हा पंतप्रधान होणार हे या निकालामुळे स्पष्ट झाले. नरेंद्र मोदी यांनी वाराणसीमधून जवळपास दीड लाख मतांनी विजय मिळवून तिसऱ्यांदा संसदेत स्थान मिळविले. गेल्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने ३०३ जागा मिळविल्या होत्या तर एनडीएला ३५३ जागी यश मिळाले होते. यावेळी त्यात घट झाली पण बहुमत एनडीएलाच मिळाले.
हे ही वाचा:
घोषणा ‘४०० पार…’ची निकाल ३०० च्या आत… भाजपाचे गणित कुठे चुकले?
पुण्यात हरले मोरे-धंगेकर, जिंकले मुरलीधर!
अबब…अमित शहांचे लीड ७ लाखावर !
रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये खणखणीत राणेंचे नाणे!
उत्तर प्रदेशात समाजवादी पार्टीने ४७ जागी यश मिळविले तर भाजपाला ३७ जागांवर समाधान मानावे लागले. गेल्यावेळेस भाजपाने उत्तर प्रदेशात ६२ जागा जिंकल्या होत्या.
महाराष्ट्रात महाविकास आघाडीने २९ जागी यश मिळविले. त्यात उद्धव ठाकरे यांनी काँग्रेससोबत जाण्याचा निर्णय घेतल्यामुळे काँग्रेसलाच फायदा झाल्याचे दिसले. काँग्रेसने गेल्या निवडणुकीत अवघी १ जागा जिंकली होती. यावेळी त्यांनी १३ जागा जिंकल्या. उद्धव ठाकरे यांना मात्र २१ जागा लढवून ९ जागाच जिंकता आल्या. शरद पवारांच्या पक्षाला मात्र यानिमित्ताने संजीवनी मिळाली. त्यांनी ७ जागी यश मिळविले. संविधान बदलले जाणार हे नरेटिव्ह प्रचाराच्या माध्यमातून तयार करणाऱ्या महाविकास आघाडीला यश मिळाले. त्याचा फटका भाजपाला बसला. त्यांना १० जागी यश मिळाले तर एकनाथ शिंदेंना १५ जागा लढवून ७ जागी यश मिळाले. अजित पवार यांना मात्र एकच जागा जिंकता आली. अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनाही बारामतीत पराभव स्वीकारावा लागला. सुप्रिया सुळे यांनी बारामतीत विजय मिळविला.
केरळमध्ये भाजपाने खाते उघडले. भाजपाचे नेते सुरेश गोपी यांनी तिथे विजय मिळविला. हा केरळमधील भाजपाचा पहिलाच विजय ठरला. शिवाय, कर्नाटकमध्ये भाजपाने २८ जागांपैकी १९ जागी यश मिळविले.
राज्याराज्यांतील मतदान
उत्तर प्रदेश (८०) सपा ४२, भाजपा ३७
महाराष्ट्र (४८) मविआ २९, महायुती १८
पश्चिम बंगाल (४२) तृणमूल ३१, भाजपा १०
बिहार (४०) भाजपा ३० राजद १०
मध्य प्रदेश (२९) भाजपा २९
कर्नाटक (२८) भाजपा १९, काँग्रेस ९
राजस्थान (२५) भाजपा १४, काँग्रेस ११
छत्तीसगड (११) भाजपा ९, काँग्रेस २
दिल्ली (७), भाजपा ७
उत्तराखंड (५) भाजपा ५