पूजा चव्हाण प्रकरणात महिला आयोगाची एन्ट्री

पूजा चव्हाण प्रकरणात महिला आयोगाची एन्ट्री

राज्यभर चर्चेत असलेल्या पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात आता राष्ट्रीय महिला आयोगाने एन्ट्री घेतली आहे. महिला आयोगाने एक प्रसिद्धी पत्रक काढत या विषयीची माहिती दिली आहे. राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष रेखा शर्मा यांनी या संबंधी पोलीस प्रशासनाला पत्र लिहिले आहे.

पूजा चव्हाण या मूळच्या परळीच्या तरुणीने पुण्यात सात फेब्रुवारी रोजी आत्महत्या केली. पण ही खरंच आत्महत्या आहे की हत्या याचा उलगडा अजून झालेला नाही. याच प्रकरणात राज्य सरकार मधील संजय राठोड या मंत्र्याचे नाव आल्याने या प्रकरणाला वेगळेच वळण मिळाले आहे. या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होणे गरजेचे आहे. या प्रकरणाची राष्ट्रीय महिला आयोगाने दखल घेतली असून महिला आयोगाच्या प्रमुख रेखा शर्मा यांनी राज्याच्या पोलीस महासंचालकांना पत्र लिहिले आहे. पोलिसांनी या प्रकरणात योग्य ती कारवाई करावी आणि याचा अहवाल महिला आयोगाकडे सादर करावा असे या पत्रात म्हटले आहे.

हे ही वाचा:

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण, शिवसेनेचे मंत्री संजय राठोड ‘नॉट रिचेबल’

दरम्यान या प्रकरणात विरोधक चांगलेच आक्रमक झाले असून सरकारला चांगलेच धारेवर धरले आहे. पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सोबतच शिवसेनेच्या सर्वच मंत्र्यांनी या प्रकरणात सावधगिरीची भूमिका घेत बोलणे टाळले आहे. मुख्यमंत्र्यांनी ‘योग्य ती कारवाई होईल’ एवढीच प्रतिक्रिया या संदर्भात दिली आहे.

Exit mobile version