राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने शासकीय निधीचा वापर करून कोकणात शिवसेना फोडली असल्याचा आरोप शिवसेना नेते रामदास कदम यांनी केला आहे. शिवसेना नेते परिवहन मंत्री अनिल परब हे कोकणातील शिवसेना-राष्ट्रवादीचा घशात घालत आहेत असा हल्लाबोलही कदम यांनी केला. कदम यांच्या आरोपांमुळे महाविकास आघाडीतील घटक पक्षांची अंतर्गत धुसफूस पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे.
शनिवार, १८ डिसेंबर रोजी शिवसेना नेते रामदास कदम यांनी पत्रकार परिषदेत स्वपक्षातील नेत्यांवरच हल्ला चढवला आहे. शिवसेना नेते मंत्री अनिल परब हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घशात शिवसेना घालत असल्याचा आरोप कदम यांनी केला आहे. तर कोकणात राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेनेला खिंडार पाडले असेही कदम यांनी म्हटले आहे. त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने शासनाच्या निधी वापरल्याचाही आरोप रामदास कदम यांनी केला आहे.
हे ही वाचा:
‘अशोकराव, उद्धवजी मुख्यमंत्री नसते तर तुम्ही कुठे असता?’
‘अमरावतीची घटना पुन्हा घडली तर त्यांना सोडायचे नाही’
अनिल परब, हा तुझ्या बापाचा पैसा आहे का?
शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे की अनिल परब?
कोकणात कुणबी भवन बांधण्याच्या बदल्यात शिवसैनिकांनी राष्ट्रवादीत प्रवेश करावा अशा प्रकारचा प्रस्ताव राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसैनिकांसमोर ठेवला आणि दापोलीतील शिवसैनिक फोडले असा घणाघात रामदास कदम यांनी केला. कुणबी भवन बांधण्यात यावे अशी मागणी गेल्या काही काळापासून कोकणातून होत आहे. शिवसेना या मागणीसाठी आग्रही होती. याचा फायदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने घेतला. कुणबी भवनासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी निधी मंजूर केला आणि त्या बदल्यात कोकणातील शिवसैनिकांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला.
राष्ट्रवादीचे कोकणातील नेते सुनील तटकरे हे यावेळी उपस्थित होते. तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश पार पडला. याबाबत आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले होते असे रामदास कदम यांनी सांगितले. तर उद्धव ठाकरे यांनी या बाबत जयंत पाटील यांना विचारणा केली असता ते सर्व तटकरेंनी केले असल्याचे पाटील म्हणाले असा गौप्यस्फोट रामदास कदम यांनी केला आहे. रामदास कदम यांच्या पत्रकार परिषदेमुळे महाविकासआघाडी पक्षांमध्ये सारे काही आलबेल नाही हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.