राज्याचे समाजकल्याण मंत्री धनंजय मुंडेंच्या अडचणीच्या काळात राष्ट्रवादी पक्ष ठामपणे त्यांच्या मागे उभा राहिला आहे. राष्ट्रवादीने धनंजय मुंडे यांचा राजीनामा न घेण्याचा निर्णय पक्षाच्या उच्च स्तरिय बैठकीत घेण्यात आला.
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या सोबतच पक्षातले सर्व बडे नेते या बैठकीला उपस्थित होते. धनंजय मुंडे हे अजित पवारांचे निकटवर्तीय मानले जातात त्यामुळे राष्ट्रवादी पक्षात शरद पवार यांच्यापेक्षा अजित पवार यांचे पारडे जड आहे का? अशा चर्चेला पुन्हा उधाण आले आहे.
हे ही वाचा:
रंगलेल्या तोंडाचे राष्ट्रवादी….
समाजकल्याण मंत्री धनंजय मुंडेंवर बलात्काराचे आरोप….आमदारकी जाणार?
धनंजय मुंडे यांच्यावर रेणू शर्मा नावाच्या महिलेने बलात्काराचा आरोप केला होता. धनंजय मुंडे यांनी हे आरोप फेटाळले असले तरिही शरद पवार यांनी मात्र हे आरोप गंभीर स्वरूपाचे असल्याची प्रतिक्रिया माध्यमांशी बोलताना दिली होती. धनंजय मुंडे यांच्याविरोधात कारवाई करावी का यासाठी १४ जानेवारी रोजी राष्ट्रवादी पक्षाची महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत दोन गट पहायला मिळाल्याचे समजते. एक गट कारवाई च्या समर्थनात होता तर मुंडे यांच्यावर कारवाई करू नये असे दुसऱ्या गटाचे म्हणणे होते. अखेर रात्री उशीरा संपलेल्या बैठकीत धनंजय मुंडे यांच्याविरोधात पक्षपातळीवर कारवाई न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राष्ट्रवादीचे सर्वोच्च नेते शरद पवार ज्या आरोपांना गंभीर म्हणतात त्यासाठी नेत्यावर कारवाई का होत नाही? असा प्रश्न उपस्थित होत आहे. तर मुंडेंविरोधात कारवाई न होणे हे पुन्हा अजित पवार गटाचे पक्षातले वर्चस्व अधोरेखीत करते का? अशीही चर्चा सुरू झाली आहे.
पक्ष पातळीवर धनंजय मुंडे यांच्यावर कारवाई झाली नसली तरी बलात्काराचे आरोप झालेल्या मंत्र्याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आपल्या मंत्रीमंडळात ठेवणार का? हे बघणे महत्वाचे आहे. तसेच निवडणूक प्रतिज्ञापत्रात संपत्ती आणि अपत्यांची माहिती लावल्यामुळे निवडणूक आयोग मुडेंवर नेमकी काय कारवाई करणार याकडेही सर्वांचे लक्ष्य आहे.