महाराष्ट्रात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही पक्ष एकत्र सत्ता उपभोगत आहेत. महाविकास आघाडीत एकत्र असलेले हे पक्ष ठाण्यात मात्र एकमेकांसमोर उभे ठाकलेले दिसत आहेत. शिवसेनेची सत्ता असलेल्या ठाणे महानगरपालिकेच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष रस्त्यावर उतरला आहे. विशेष म्हणजे राज्याचे गृहनिर्माण मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ठाण्यातील नेते जितेंद्र आव्हाड यांच्या पत्नी ह्या आंदोलनात रस्त्यावर उतरल्या.
हे ही वाचा:
फडणवीसांचा एक फोन आणि महाराष्ट्रासाठी ऑक्सिजन एक्स्प्रेस
राहुल गांधी यांना कोरोनाची लागण
अहमदनगरमध्ये ७०० रुग्ण मृत्युच्या दाढेत
सर्वोच्च न्यायालयाचा योगी सरकारला टाळेबंदीबाबत तूर्तास दिलासा
महाराष्ट्रात होणारी रोजची कोरोनाची रुग्णवाढ ही देशभरात सर्वाधिक आहे. महाराष्ट्रातील महत्वाचा ठाणे जिल्हाही यात मागे नाही. ठाण्यात कोरोनाच्या रुग्णांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. अगदी रुग्णालयात बेड मिळवण्यापासून ते ऑक्सिजन, रेमडेसिवीरपर्यंत. ठाण्यातील कोरोना रुग्णांना ऑक्सिजन, रेमडेसिवीरचा पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अक्रमक झालेला दिसला. मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे ठाणे महानगरपालिकेच्या पायऱ्यांवर बसून आंदोलन केले. या आंदोलनाचे नेतृत्व स्वतः गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या पत्नी ऋता आव्हाड यांनी केले. यावेळी आंदोलनकर्त्यांनी महापालिकेच्या गेटवर ऑक्सिजनच्या बाटल्या ठेवल्या. राष्ट्रावादी काँग्रेस पक्षाच्या या आंदोलनाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पण साथ दिली. मनसेचे ठाण्यातील नेते अविनाश जाधव हे देखील या आंदोलनात सहभागी झाले होते.
शिवसेनेचा गड मानल्या जाणाऱ्या ठाणे महापालिकेच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केलेले आंदोलन हे ठाण्याचे पालकमंत्री आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांना आव्हान मानले जात आहे. त्यामुळे राज्याच्या मंत्रिमंडळात एकत्र असणारे शिंदे आणि आव्हाड हे दोन मंत्री स्थानिक समिकरणात एकमेकांसमोर उभे ठाकणार का? याकडे ठाणेकरांचे लक्ष आहे. अवघ्या काही महिन्यांवर आलेल्या ठाणे महापालिकेच्या निवडणुकांच्या दृष्टीनेही हे आंदोलन महत्वाचे मानले जात आहे.