भाजपा आणि शिवसेनेनंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानेही विधानपरिषदेसाठी आपल्या उमेदवाराची घोषणा केली आहे. एकूण पाच जागांसाठी विधानपरिषदेसाठी पोटनिवडणूक पार पडणार आहे. यासाठी तीन जागा भाजपकडे तर एक एक जागा शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याकडे आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने आता आपला उमेदवार विधानपरिषदेच्या रिंगणात उतरवला आहे. संजय खोडके यांना संधी देण्याचा निर्णय पक्षाने घेतला आहे. संजय खोडके हे विदर्भातील नेते असून ते आमदार सुलभा खोडके यांचे पती आहेत.
राज्यात विधानसभा निवडणुकीनंतर रिक्त झालेल्या विधानपरिषदेच्या पाच जागांसाठी पोटनिवडणुक २७ मार्च रोजी पार पडणार आहे. आज यासाठी अर्ज भरायचा शेवटचा दिवस असून दुपारी तीन वाजेपर्यंतची मुदत आहे. भाजपा आणि शिवसेनेने आपले उमेदवार जाहीर केल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून निवडणूक रिंगणात कोण उतरणार याकडे लक्ष होते. अखेर राष्ट्रवादीनेही उमेदवार घोषित केल्यामुळे आता महायुतीचे पाचही उमेदवार ठरले आहेत.
विधानपरिषदेच्या पाच जागांसाठी महायुती सरकारमध्ये तीन जागा भाजपच्या वाट्याला आल्या आहे. या तीन जागांसाठी भाजपाकडून दादाराव केचे, संजय केणेकर आणि संदीप जोशी यांना संधी देण्यात आली आहे. तर, शिवसेनेकडे असलेल्या एका जागेवर चंद्रकांत रघुवंशी यांची वर्णी लागली आहे. तर, राष्ट्रवादी काँग्रेसकडून संजय खोडके यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
हे ही वाचा :
अमृतसर मंदिरात ग्रेनेड हल्ल्यातील आरोपी पोलिस चकमकीत ठार!
स्वामी विवेकानंद यांच्या शिक्षणाने माझ्या जीवनदृष्टीचा पाया घातला
‘5G इनोव्हेशन हॅकाथॉन 2025’ची केंद्राकडून घोषणा
विधानपरिषदेसाठी शिवसेनेकडून चंद्रकांत रघुवंशी यांच्या नावावर शिक्कामोर्तब
भाजपाने संधी दिलेले संदीप जोशी हे नागपूरमधून असून ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय मानले जातात. संदीप जोशी हे नागपूरचे माजी महापौर आहेत. संजय केनेकर हे पक्षाचा ओबीसी चेहरा आहेत. तर, संजय केनेकर हे छत्रपती संभाजीनगरमधून येतात. त्यांनी पक्षाचे महामंत्री म्हणून उत्तम काम केलेलं आहे. दादाराव केचे यांना विधानसभेच्यावेळी तिकीट नाकारण्यात आलं होतं त्यामुळे त्यांची आता विधान परिषदेवर वर्णी लागली आहे. तर, शिवसेनेकडून वर्णी लागलेले चंद्रकांत रघुवंशी हे धुळे- नंदुरबारचे शिवसेना संपर्क प्रमुख आणि माजी विधानपरिषद सदस्य आहेत. चंद्रकांत रघुवंशी यांनी यापूर्वी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत काम केलं आहे. ते पूर्वी काँग्रेसमध्ये होते. २०१९ मध्ये त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आणि नंतर फुट पडल्यावर एकनाथ शिंदे यांची साथ दिली.