वादग्रस्त खासदार मोहम्मद फैजल यांना पुन्हा मिळाली खासदारकी

१० वर्षांची शिक्षा सुनावण्यात आल्यानंतर गेली होती खासदारकी, उच्च न्यायालयाने शिक्षा स्थगिती केली होती.

वादग्रस्त खासदार मोहम्मद फैजल यांना पुन्हा मिळाली खासदारकी

काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी काढून घेतल्यामुळे सध्या देशभरात त्याची चर्चा सुरू असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे लक्षद्वीपमधील खासदार मोहम्मद फैजल यांची रद्द करण्यात आलेली खासदारकी त्यांना पुन्हा मिळाली आहे.

केरळ उच्च न्यायालयाने फैजल यांना ठोठावण्यात आलेली १० वर्षांची शिक्षा स्थगित केल्यामुळे त्यांना खासदारकी मिळणे अपेक्षित होते, पण लोकसभा सचिवालयाकडून खासदारकी मिळत नसल्याने त्यांनी सर्वोच्च न्यायालयात जाण्याची निर्णय घेतला. त्याची सुनावणी होणार असतानाच ही खासदारकी त्यांना परत करण्यात आली आहे.

बुधवारी लोकसभा सचिवालयाने तशी नोटीस जारी केली असून राष्ट्रवादी काँग्रेसचे मोहम्मद फैजल यांची खासदारकी पुन्हा त्यांना बहाल करण्यात येत आहे. लोकसभा सचिवालयाने २९ मार्चला तसेच पत्र पाठवले असून त्यात उच्च न्यायालयाने २५ जानेवारीला दिलेल्या आदेशानुसार मोहम्मद फैजल यांची अपात्रता रद्द करण्यात येत आहे.

हे ही वाचा:

गुगल, मायक्रोसॉफ्टला टक्कर .. लवकरच येतोय भारतीय बनावटीचा चॅटजीपीटी

भाजपचे लढवय्ये आणि अजातशत्रू खासदार गिरीश बापट यांचे निधन

करमुसे प्रकरणातील आरोपी आणि जितेंद्र आव्हाडांचे माजी अंगरक्षक वैभव कदम यांची आत्महत्या

भाजपा शिवसेना युतीचे नेते म्हणत आहेत ‘मी सावरकर, आम्ही सावरकर’

कवारात्ती येथील सत्र न्यायालयाने फैजल यांना ११ जानेवारी २०२३ रोजी दोषी धरून त्यांना १० वर्षांची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर लोकसभा सचिवालयाने त्यांची खासदारकी काढून घेतली होती. ज्या दिवशी एखादा खासदार किंवा आमदार दोषी ठरतो त्या दिवसापासून त्याची खासदारकी किंवा आमदारकी रद्द होते. पण फैजल यांच्या शिक्षेला उच्च न्यायालयात स्थगिती देण्यात आली त्यामुळे खासदारकी त्यांना पुन्हा मिळणे अपेक्षित होते.

काँग्रेसचे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री पी.एम.सईद यांचे जावई मोहम्मद सली यांची हत्या करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल फैजल आणि इतर तिघांना दोषी धरण्यात आले होते. सय्यद मोहम्मद नुरूल अमीन आणि फैजल यांचा भाऊ मोहम्मद हुसेन तसेच मोहम्मद बशीर थंगल यांना दोषी धरण्यात आले होते. १० वर्षांच्या शिक्षेसोबत त्यांच्यावर प्रत्येकी १ लाखांचा दंडही ठोठावण्यात आला होता.

Exit mobile version