हत्येचा आरोप असलेल्या राष्ट्रवादी आमदाराच्या मुलाला अटक

हत्येचा आरोप असलेल्या राष्ट्रवादी आमदाराच्या मुलाला अटक

पिंपरी विधानसभेतील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अण्णा बनसोडे यांच्या मुलाला अखेर अटक करण्यात आली आहे. सिद्धार्थ बनसोडे याला रत्नागिरीतील पावसमधून बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. तानाजी पवार यांच्या कंपनीतील कर्मचाऱ्याला मारहाण आणि हत्येचा प्रयत्न केल्या प्रकरणी सिद्धार्थ बनसोडेवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. आमदार पुत्राला पकडण्यात होत असलेल्या दिरंगाईमुळे पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांच्यावर राजकीय दबाव तर नाही ना, अशी चर्चा सुरु होती.

पिंपरी चिंचवडमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अण्णा बनसोडे यांच्यावर काही दिवसांपूर्वी गोळीबार करण्याचा प्रयत्न झाला होता. या प्रकरणातील आरोपी तानाजी पवारने उलट आमदार पुत्र सिद्धार्थ बनसोडे आणि त्याच्या साथीदारांवरच अपहरण आणि हत्येचा प्रयत्न केल्याचा आरोप केला होता. त्यानंतर पिंपरी चिंचवडमध्ये सिद्धार्थ बनसोडेवर गुन्हा दाखल करण्यात आला.

तानाजी पवार यांच्या कंपनीकडूनही सिद्धार्थवर कर्मचाऱ्याला मारहाण आणि हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

दोन वेगवेगळ्या गुन्ह्यात पोलिसांना सिद्धार्थ बनसोडेचा शोध होता. अखेर रत्नागिरी जिल्ह्यातील पावसमधून त्याला अटक करण्यात आली.

पिंपरी चिंचवड महापालिकेचे कंत्राटदार सिजू अँथनी यांच्या कार्यालयात सिद्धार्थ बनसोडे ११ मे रोजी दुपारी घुसले होते. त्यानंतर दोघा कर्मचाऱ्यांवर हल्ला केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला. लोखंडी टॉमीसारख्या घातक शस्त्राने दोघांवर हल्ला केल्याचं सीसीटीव्हीत देखील कैद झालं आहे. अँथनी यांच्या कंपनीचे मॅनेजर तानाजी पवार कुठे आहेत, हे कर्मचाऱ्यांनी न सांगितल्याच्या रागातून आमदारपुत्र आणि पीएसह दहा जणांनी हा जीवघेणा हल्ला केल्याचा उल्लेख तक्रारीत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे पिंपरी विधानसभेचे आमदार अण्णा बनसोडे यांच्यावर बुधवार १२ मे रोजी गोळीबार झाला होता. मात्र, या घटनेत कोणीही जखमी झालेलं नाही. पिंपरी चिंचवड पोलिसांकडून या प्रकरणी तपास करण्यात आला.

हे ही वाचा:

मराठा आरक्षणावर दहा मिनिटांत सकारात्मक चर्चा?

कोरोना न होताही आमदार क्वॉरन्टीन

ठाकरे सरकारमध्ये शिवसेनाच नाराज?

संबित पात्रा केजरीवालांवर बरसले

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अण्णा बनसोडे हे २०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत पिंपरी मतदारसंघातून विजयी झाले आहेत. यापूर्वी ते २००९ मध्येही निवडून आले होते. नंतर २०१४ मध्ये अण्णा बनसोडे यांचा शिवसेना उमेदवार गौतम चाबुकस्वार यांनी २ हजार मतांनी पराभव केला होता. २०१४ च्या निवडणुकीत पराभव झाल्यानंतर अण्णा बनसोडे यांनी पिंपरी मतदारसंघात जनसंपर्क वाढवला. त्यानंतर २०१९ च्या निवडणुकीत अण्णा बनसोडे यांनी शिवसेनेचे तत्कालीन आमदार गौतम चाबुकस्वार यांचा १६ हजार ८५६ मतांनी पराभव केला होता.

Exit mobile version