जळगाव जिल्हा सहकारी बँकेत राष्ट्रवादीला भोवली फूट

अध्यक्षपदी संजय पवार, रवींद्र पाटील यांना पत्करावी लागली हार

जळगाव जिल्हा सहकारी बँकेत राष्ट्रवादीला भोवली फूट

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यामुळे जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निकालात त्याचे प्रतिबिंब उमटले आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला. हा पराभव राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे यांना मोठा धक्का मानला जात आहे. त्यांचे या बँकेवर वर्चस्व होते. महाविकास आघाडीला महाराष्ट्रात कसे यश मिळत आहे याचे रोज कौतुक केले जात असताना बँकेच्या निवडणुकीत मात्र राष्ट्रवादीला धक्का बसला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसने जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील यांचे नाव बँकेच्या अध्यक्षपदासाठी निश्चित केले होते पण राष्ट्रवादीच्याच संजय पवार यांनी बंडखोरी केली आणि राष्ट्रवादीत उभी फूट पडली. शेवटी संजय पवार हेच विजयी ठरले. त्यामुळे या बँकेच्या अध्यक्षपदावर ठरलेला उमेदवार राष्ट्रवादीला निवडून आणता आला नाही. मात्र संजय पवार हे राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचे समर्थक मानले जातात.

हे ही वाचा:

सदानंद कदम ईडीच्या ताब्यात.. लवकरच न्यायालयात हजर करणार

छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ ‘टॉप’

तेजस्वी यादव, लालू यादवांच्या मुलींच्या घरातून मिळाली रोकड, २ किलो सोने

मुश्रीफ यांच्या घरावर पुन्हा धाड; समर्थकाने डोके फोडून घेतले

बँकेत महाविकास आघाडी आणि शिवसेना (एकनाथ शिंदे) यांची संयुक्त सत्ता होती. महाविकास आघाडीतील पक्ष असलेल्या राष्ट्रवादीकडे अध्यक्षपद तर उपाध्यक्षपद शिवसेनेकडे देण्यात येणार होते. बँकेचे अध्यक्ष तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार गुलाबराव देवकर व उपाध्यक्ष श्यामकांत सोनावणे यांनी राजीनामा दिल्याने ही निवडणूक झाली. त्यावेळी राष्ट्रवादी आणि शिवसेना असा हा सत्तेच्या वाटपाचा फॉर्म्युला ठरला होता.

राष्ट्रवादीने रवींद्र पाटील यांना अध्यक्षपदासाठी पसंती दिली होती. त्यावेळी संजय पवार, सतीश पाटील, प्रदीप देशमुख यांचीही नावे चर्चेत होती. पण रवींद्र यांचे नाव निश्चित केल्यानंतर नाराजी निर्माण झाली. तेव्हा संजय पवार यांनी बंडखोरी करत अर्ज दाखल केला. त्यांना भाजपा, शिंदे यांच्या शिवसेनेने आणि काँग्रेसने मदत केल्यामुळे राष्ट्रवादीच्या रवींद्र पाटील यांना हार मानावी लागली. उपाध्यक्ष म्हणून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे अमोल पाटील विजयी ठरले. त्यांची बिनविरोध निवड झाली.

Exit mobile version