महाराष्ट्र विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या सुरु असून पहिल्या दोन दिवसांतच हे अधिवेशन वादळी ठरताना दिसत आहे. सध्या ईडीच्या कोठडीत असलेले राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून विरोधी पक्ष आक्रमक झालेला दिसत आहे. पण आता विरोधकांच्या या मागणीला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचेच नेते समर्थन देताना दिसत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार आणि विधानसभेचे उपसभापती नरहरी झिरवळ यांनी नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या स्वाक्षरी मोहिमेत सहभाग नोंदवला आहे.
शुक्रवार, ४ मार्च रोजी राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष असणाऱ्या भारतीय जनता पार्टीने पुन्हा एकदा नवाब मलिकांच्या राजीनाम्याचा मुद्दा उचलून धरला. पहिल्या दिवशीही विरोधक या मागणीवरून आक्रमक झालेले पाहायला मिळाले होते. अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी कामकाज सुरु होण्याआधी विरोधी पक्षाचे आमदार मलिकांच्या राजीनाम्यासाठी आंदोलन करत होते.
हे ही वाचा:
सर्व कामकाज बाजूला ठेवून ओबीसी आरक्षणावर चर्चा करा
भारतीय संघापुढे श्रीलंका आव्हान उभे करणार?
शतकांच्या कसोटी यज्ञांतून उठली विराट ज्वाला
ओबीसी आरक्षणाशिवाय राज्यात निवडणूक नाहीत
यावेळी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर बसून भाजपा आमदारांची जोरदार घोषणाबाजी सुरु होती. तर मलिकांच्या राजीनाम्यासाठी भाजपामार्फत सह्यांची मोहीमही राबवण्यात आली. या स्वाक्षरी मोहीमेत भाजपाचे आमदार हिरीरीने सहभाग नोंदवत होते. या आंदोलनाच्या दरम्यानच विधानसभेचे उपसभापती असलेले राष्ट्रवादीचे आमदार नरहरी झिरवळ हे सभागृहात दाखल होते. भाजपा आमदारांनी झिरवळ यांच्याकडे सहीसाठी आग्रह केला. तेव्हा झिरवाळ यांनी देखील सभागृहात जाता जाता नवाब मलिकांच्या राजीनाम्यासाठी स्वाक्षरी केली. त्यामुळे राष्ट्रवादीच्या नेत्यांनाही मलिकांनी राजीनामा द्यावा असे वाटते का? अशी चर्चा सुरु झाली आहे.