अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक गेले काही दिवस घेत असलेल्या पत्रकार परिषदांतून नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर करत आलेले वैयक्तिक स्वरूपाचे आरोप ही राष्ट्रवादीचीही भूमिका असल्याचे शुक्रवारी स्पष्ट झाले. राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ सध्या पुण्यात असून त्यांनी ‘टीव्ही ९ मराठी’शी बोलताना मुंबई ड्रग्ज प्रकरणावर भाष्य केले आहे. त्यावेळी त्यांनी ही राष्ट्रवादीची भूमिका असल्याचे म्हटले आहे.
‘ज्याने इतरांना जेलमध्ये टाकले त्याच्या मागे आता कोर्ट कचेऱ्या लागतील’, असा इशारा छगन भुजबळ यांनी समीर वानखेडेंना दिला आहे. आर्यन खान प्रकरण, समीर वानखेडे, के. पी. गोसावी प्रकरणी नवाब मलिक जे मांडत आहेत त्याला राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा असल्याचे छगन भुजबळ यांनी म्हटले आहे. नवाब मलिकांनी जी भूमिका मांडली ती पक्षाची भूमिका असून पक्षाचा त्यांना पाठिंबा असल्याचे त्यांनी सांगितले.
हे ही वाचा:
एसटीला गळफास घेऊन आणखी एका चालकाने गमावले प्राण
रिझर्व्ह बँकेला तीन वर्षासाठी नवी ‘शक्ती’
पंतप्रधान मोदी जाणार देवभूमीत! बाबा केदारनाथचे घेणार आशीर्वाद
बॉलिवूडच्या माध्यमातून महाराष्ट्राला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे. भाजप महाविकास आघाडी सरकारविषयी जनतेत रोष निर्माण करण्याचा प्रयत्न करत असे म्हणत भुजबळांनी पुन्हा एकदा केंद्रावर सगळी जबाबदारी ढकलली आहे.
महाराष्ट्रात सुरू असलेल्या अमली पदार्थविरोधी कारवाईमुळे महाराष्ट्राची बदनामी होत असल्याचे भुजबळ म्हणाले. गुजरातच्या मुंद्रा बंदरावर सापडलेल्या अमलीपदार्थांच्या प्रकरणावरून लक्ष हटविण्यासाठी महाराष्ट्राला बदनाम करण्याचा प्रयत्न होत असल्याचा अजब दावाही त्यांनी केला.