मुंबईतील अनेक रस्त्यांची सध्याच्या घडीला अक्षरशः चाळण झालेली आहे. भाजपाने सातत्याने हा विषय लावून धरला आहे पण आता राष्ट्रवादीला या खड्डयांबाबत बोलण्यासाठी आपल्या घड्याळात अखेर वेळ सापडली आहे. त्यामुळेच आता खड्डेमुक्ती न झाल्यास राष्ट्रवादीकडून चक्क आंदोलनाचा इशारा आता देण्यात आलेला आहे.
शहरातील विकासोपयोगी कामे मंदगतीने सुरू असल्याचेही राष्ट्रवादीने म्हटले आहे. तसेच मुंबईतील जवळपास सर्वच रस्ते हे खड्डेमय झाल्याचे आता राष्ट्रवादीचे म्हणणे आहे. नुकतीच राष्ट्रवादीला आता खड्डयांसंदर्भात उशिरा जाग आली असून त्यांनी पालिकेचे प्रमुख अभियंते राजन तळकर यांनाही निवेदन सादर केले आहे. गणेशोत्सवापूर्वी खड्डे नीट बुजवले जावेत अशी मागणी यावेळी करण्यात आलेली आहे. पालिकेची निवडणूक आणि गणेशोत्सव या अनुषंगाने मतदारांना खुश करण्यासाठी राष्ट्रवादीचे हे पाऊल आहे का असा सवाल यामुळे उपस्थित केला जात आहे.
हे ही वाचा:
नारायण राणेच्या नादी लागू नका…नाही तर मला सगळेच बोलावे लागेल
अजूनही शिवसेनेची संकुचित वृत्ती
द एम्पायर या वेबसिरीजवर त्वरित बंदी घाला
‘कोळी समाजाला हद्दपार करण्याचे शिवसेनेचे कारस्थान’
मुंबईतील रस्त्यांची सध्याच्या घडीला अक्षरशः चाळण झालेली आहे. असे असले तरी महापालिकेने मात्र निधी नाही म्हणून आता अंग काढून घेतले आहे. खड्डे बुजवताना माया जमवण्यासाठी कंत्राटदार निकृष्ट प्रतीचा माल वापरून वेळ मारून नेतो. त्यामुळे सर्वसामान्य जनतेला मात्र अनेक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. खड्ड्यांमुळे बाईकस्वारांना तर पाठदुखीमुळे त्रस्त व्हायची वेळ आलेली आहे. डांबर, सिमेंट ऐवजी मुरूम माती टाकून तात्पुरते खड्डे बुजवले जात आहेत. पण पुन्हा एकदा रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे.
महापालिकेकडून अजूनही हे खड्डे बुजवण्याच्या कामामध्ये होत असलेली दिरंगाई आता वाहनचालकांच्या जीवावर बेतणारी आहे. खड्डे बुजवण्यासाठी १८०० कोटींची तरतूद केलेली असली तरी खड्डे कमी होण्याची चिन्हे नाहीत. त्यातून वाहने हाकणे आता अतिशय जिकीरीचे झालेले आहे. अनेकदा कंत्राटदारांकडून वरवरचे आणि निकृष्ट दर्जाचे काम केले जाते. त्यामुळेच मुंबईकरांना खड्डेमय रस्त्यातून प्रवास करण्याशिवाय पर्याय उरत नाही. या विरोधात सत्ताधाऱ्यांविरोधात आंदोलनाचा इशाराही राष्ट्रवादीने दिला आहे. त्यामुळे आता पालिकेतील सत्ताधारी शिवसेना आणि राज्यात त्यांच्यासोबत असलेली राष्ट्रवादी यांच्यातील संबंधांचे काय होणार असा प्रश्न उपस्थित होत आहे.