रंगलेल्या तोंडाचे राष्ट्रवादी….

रंगलेल्या तोंडाचे राष्ट्रवादी….

महाराष्ट्रात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे महाआघाडी सरकार सत्तेवर आल्यापासून राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांच्या भानगडी सातत्याने चर्चेत आहेत. सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे आणि नवाब मलिक ही या यादीतली ताजी भर. देशातल्या प्रत्येक प्रश्नावर मत नोंदवणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार या रंगलेल्या तोंडाच्या मंत्र्यांबाबत मात्र बराच काळ मिठाची गुळणी करून बसले होते.

सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी करुणा या महीलेशी विवाहबाह्य संबंध ठेवले. त्या महीलेपासून त्यांना दोन अपत्य आहेत. सामाजिक न्याय मंत्र्यांचे फोटो सोशल मीडियातून व्हायरल झाल्यानंतर या प्रकरणाची कुजबुज सुरू झाली. त्यानंतर मुंडे यांना सत्य स्वीकारणे भाग होते. 

या भानगडीबाबत कोणतेही फोटो सोशल मीडियावर टाकण्यास मज्जाव करण्यात यावा ही विनंती करत मुंडे यांनी न्यायालयात धाव घेतली. परंतु त्यांनतर स्वत:च सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली बाजू मांडण्याचा केविलवाणा प्रयत्न केला.

हे रामायण सुरू असताना करुणा यांच्या बहीणीने मुंडे यांच्या विरोधात ओशीवरा पोलिस ठाण्यात बलात्काराची तक्रार नोंदवली. पोलिसांनी याप्रकरणी 14 जानेवारीच्या दुपारपर्यंत एफआय़आऱ दाखले केलेला नाही. 

बलात्का-यांना विनाविलंब शिक्षा ठोठावण्यासाठी महाराष्ट्र मंत्रिमंडळाने शक्ती कायद्याचा मसूदा विधानसभेत मांडायला परवानगी दिली. वर्ष उलटले तरी हा कायदा मंजूर झालेला नाही. ठाकरे सरकारने या कायद्यात बलात्काराची व्याख्याच बदलली असून विवाहबाह्य संबंध हा बलात्कार मानला जाऊ नये असा बदल सदर मसूद्यात केला आहे. या मुद्यावर भाजपाने कठोर आक्षेप घेतल्यामुळे हा मसूदा सर्वपक्षीय चिकित्सा समितीसमोर गेला. मंत्रीमंडळाच्या मान्यतेनंतर वर्ष उलटले तरी त्याचे अजून कायद्यात रुपांतर झालेले नाही. राष्ट्रवादीचे नेते द्रष्टे असावेत त्यामुळे त्यांनी या मसुद्यात वर्षभरापूर्वी विवाहबाह्य संबंधांना बलात्काराच्या चौकटीबाहेर ठेवले. 

निवडणूक आय़ोगाला दिलेल्या प्रतिज्ञापत्रात धनंजय मुंडे यांनी आपले विविहबाह्य संबंध, त्यातून झालेली अपत्य आणि त्यांच्यासाठी केलेल्या खर्चाची माहीती दिली नसल्यामुळे त्यांची आमदारकी रद्द करावी अशी मागणी भाजपा नेते अतुल भातखळकर यांनी केली आहे. मुंडेच्या आमदारकीचे काय होते यापेक्षा सामाजिक न्याय मंत्र्यांच्या प्रतापामुळे पुरोगामी महाराष्ट्राच्या चेह-यावर लागलेल्या डागाचे काय हा मोठा प्रश्न आहे.

उत्तर प्रदेशात वाढत्या महिला अत्याचारांचा विरोध करण्यासाठी राज्यात राष्ट्रवादी काँग्रसच्या महिला मोर्चाने महाराष्ट्रात घंटानाद करण्याचे जाहीर केले होते. जेव्हा ही घोषणा करण्यात आली त्याचवेळी राष्ट्रवादी युवक काँग्रसेचा प्रदेशाध्यक्ष मेहबुब शेखवर नोकरीचे आमीष दाखवून बलात्कार केल्याचा आरोप एका तरुणीने केला. परंतु राष्ट्रवादी महिला काँग्रेसचा घंटानाद मेहबूब शेखच्या विरोधात झाला नाही. करुणा यांच्या बहीणीने धनंजय यांच्यावर बलात्काराचा आरोप केला आहे, त्यांच्याविरोधातही या महिला घंटानाद करण्याची शक्यता नाही. स्वपक्षीय नेत्यांनी केलेल्या बलात्कारासारख्या गुन्ह्यावर राष्ट्रवादीच्या महिला पदाधिका-यांचे मौन पुरोगामी महाराष्ट्राला अस्वस्थ करणारे आहे.

पक्षाच्या पदाधिका-यांचाही मुंडे यांना आशीर्वाद असावा. बलात्काराचे आरोप झाल्यानंतर धनंजय मुंडे हे अजित पवारांसोबत एका बैठकीत सहभागी झाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांचीही त्यांनी भेट घेतली. शरद पवार हे पुरोगाम्यांचे आयकॉन आहेत. देशातील पहिले महिला धोरण पवार साहेबांमुळे महाराष्ट्रात राबविण्यात आले हा पुरोगाम्यासाठी कौतुकाचा विषय असतो. परंतु राष्ट्रवादीचे नेते या महिला धोरणाच्या चिंधड्या उडवताना पवार गप्प होते. पक्षातील पदाधिकारी आणि मंत्री अशा दोघांवर बलात्काराचा आरोप झाल्यानंतरही पवार बराच काळ गप्प राहीले. बराच गदारोळ झाल्यानंतर पक्षातील सहकार्यांशी चर्चा करून योग्य तो निर्णय घेऊ अशी प्रतिक्रीया त्यांनी दिली. एका महीलेने अत्याचाराची उघड फिर्याद केल्यानंतर तिला न्याय द्यायचे सोडून राष्ट्रवादीचे नेतृत्व त्यावर चर्चा करते. सोशल मीडियावर व्यक्त केलेल्या सरकारविरोधी टीप्पणीवर कठोर कारवाई करणारे पोलिस एफआयआर करण्यासाठी नेत्यांच्या आदेशाची वाट बघत बसतात हे कोणत्याही सुसंस्कृत माणसाला चीड आणणारे आहे.

अग्रलेखातून पंतप्रधान नरेंद्र मोदी, डोनाल्ड ट्रम्प यांना सल्ले देणारे सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत या विषयावर गप्प आहेत किंवा पत्रकार त्यांच्यापर्यंतही पोहोचले नाहीत.

राज्याच्या सामाजिक न्यायमंत्र्यांच्या भानगडींची चर्चा जोरात असताना अल्पसंख्यांक विकास मंत्री नवाब मलिक यांचा जावई समीर खान अंमली पदार्थांच्या रॅकेटमध्ये असल्याचे उघड झाले आहे. नोर्कोटीक्स कंट्रोल ब्युरोच्या अधिका-यांनी काल त्याला अटक केली. त्याच्या घरातून २०० किलो ड्रग्जचा साठा जप्त करण्यात आला आहे. 

पवार मुख्यमंत्री असताना त्यांच्यासोबत माफीया दाऊदच्या गुंडानी प्रवास केला होता त्याची आठवण या घटनेमुळे झाली. त्यावेळी रमेश दुबे या मंत्र्याची विकेट काढून पवार यांनी प्रकरण झटकून टाकले. अंगाशी आले की ते मुंडे आणि मलिक यांची विकेट घ्यायला मागेपुढे पाहाणार नाही. परंतु मंत्र्यांच्या या माजोर वर्तणुकीच्या उगमाचा शोध घेण्याची गरज आहे. ईडीची चौकशी सुरू असलेल्या वाधवान कुटुंबियांना लॉकडाऊनच्या काळात महाबळेश्वरचा पास देणा-या अमिताभ गुप्ता यांची पुणे पोलिस आय़ुक्त पदी बढती होते. कायदा मोडणारे हात वेगळे असले तरी त्या हातांना कामाला लावणा-या शक्ति वेगळ्या आहेत. या प्रवृत्तींना कोणाचा आशीर्वाद आहे?  याचा पर्दाफाश करण्याची गरज आहे

 

Exit mobile version