गेले काही दिवस महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारचे कॅबिनेट मंत्री नवाब मलिक नार्कोटीक्स कण्ट्रोल ब्युरोच्या विरोधात रोजच्या रोज पत्रकार परिषदा घेतायत. लोकांची दिवाळी सर्व न्यूज चॅनेलवर मलिकांचा चेहरा, फुसके बार आणि धूर पाहण्यात गेली.
मलिकांच्या दरबारात नित्यनियमाने हजेरी लावणारे पत्रकार त्यांच्या प्रत्येक आरोपावर माना डोलावताना आणि चॅनलवर ‘नवाब मलिक यांचे स्फोटक आरोप’, ‘मलिक यांनी उघड केली खळबळजनक माहिती’ अशाप्रकारचे मथळे सजवताना दिसले.
मुळात चॅनेलच्या मालकांचे जे ठरले आहे, त्या बातम्यांच्या माळा तडतडवणे एवढेच काम पत्रकारांना उरले आहे. कोरोना महामारीच्या काळात नोकरी टिकवली हे देखील यश मानावे, अशी पत्रकारांची परिस्थिती आहे. मालक मंडळींनी आर्थिक परिस्थिती डळमळीत झाल्याचे कारण पुढे करून अनेक पत्रकारांच्या नोकऱ्यांवर टाच आणली असल्यामुळे, असे वाटून घेणे गैरही नाही. अशा काळात मंत्र्याला अडचणीत आणणारा प्रश्न विचारून कोण स्वत:च्या पायावर धोंडा मारून घेईल?
अनिल देशमुख गोत्यात आल्यानंतर सारवासारव करण्यासाठी दिल्लीत घेतलेल्या एका पत्रकार परिषदेत अडचणीचे प्रश्न विचारल्यामुळे कावलेल्या जाणत्या पवारांनी ‘टाइम्स नाऊ’च्या महिला पत्रकाराला फटकारले होते, ही घटना फार जुनी नाही. ती ‘टाइम्स नाऊ’ची पत्रकार होती म्हणून बधली नाही. बाकी महाराष्ट्रात अशा खमक्या पत्रकारांचा दुष्काळच आहे. प्रवचनाला गेल्यासारखे मलिकांच्या पत्रकार परिषदांना हजेरी लावणाऱ्या पत्रकारांची मानसिकता आणि त्या मानसिकतेच्या मागची कारणमीमांसा ही अशी आहे.
पण मलिकांचे हे कीर्तन भक्तीभावाने ऐकून तीर्थप्रसाद घेऊन घरी जायला प्रत्येक जण बांधील थोडाच आहे!
मलिक यांनी ज्यांच्याविरोधात आरोप केले ते समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे, भाजपा नेते मोहीत कंबोज ही सगळी मंडळी मलिक यांच्याविरुद्ध दाद मागण्यासाठी न्यायालयात गेली आहेत.
पत्रकारांसमोर आरोप करणाऱ्या मलिकना आजवर न्यायालयात जाऊन दाद मागण्याची बुद्धी झाली नसली तरी आता मात्र याप्रकरणी त्यांना न्यायालयाला जबाब देणे भाग पडणार आहे.
ज्ञानदेव वानखेडे यांनी दाखल केलेल्या अब्रुनुकसानीच्या दाव्यावर सुनावणी करताना मुंबई उच्च न्यायालयाने याप्रकरणी नवाब मलिक यांना प्रतिज्ञापत्राद्वारे उत्तर दाखल करायला सांगितले आहे.
‘तुम्ही ट्वीटरवर उत्तरं देता तिच न्यायालयासमोर द्या’, अशा कानपिचक्या मलिक यांना देण्यात आले आहे.
न्यायालयाच्या आदेशामुळे मलिक यांचे विमान जमिनीवर येण्याची शक्यता आहे. कारण बाष्कळ बडबड, पत्रकारांसमोर सादर केलेले मदरसाछाप पुरावे न्यायालयात टिकत नाहीत.
एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांचे वडील मुस्लीम कसे? ही फॅमिली बोगस कशी? हे आता मलिक यांना सप्रमाण सिद्ध करावे लागेल. समीर वानखेडे यांच्या दोन लाखांच्या बुटांचे बिल सादर करावे लागेल.
दिवाळी संपल्यानंतर मलिकांची आतषबाजी सुरू आहे. मुख्यमंत्र्यांनी ‘धूर काढू नका’, असे जाहीर आवाहन करूनही ते रोज फुसके बार सोडून वातावरण दूषित करण्याचे काम करतायत.
समीर यांची आई, वडील, पत्नी यांच्यावर शिंतोडे उडवल्यांनंतर आता मलिक यांनी क्रांती रेडकर यांची बहीण आणि समीर वानखेडे यांची मेहूणी हर्षदा हिच्यावर ड्रग्जप्रकरणी पुणे न्यायालयात खटला सुरू असल्याचा ताजा आरोप केला आहे.
हा मात्र कडेलोट आहे. समीर वानखेडे आयआरएस झालेही नव्हते तेव्हाचे प्रकरण उकरून मलिक यांना नेमके काय सिद्ध करायचे आहे? वानखेडे यांची मेहूणी काय करते याचा त्यांच्याशी काय संबंध?
मलिक यांचा जावई गांजाच्या तस्करी प्रकरणी गजाआड झाल्यानंतरही ते मंत्री आहेत ना? आपल्याकडे कायद्यात जावयाच्या गुन्ह्याची सजा सासऱ्याला देण्याची तरतूद नाही.
समीर वानखेडे यांनी आर्यन खानवर केलेली कारवाई हे मोठे षडयंत्र होते, एनसीबीने आपल्या जावयावर केलेली कारवाई चुकीची होती हे सांगण्यासाठी मलिक यांनी पत्रकार परिषदांचा धोबीघाट सुरू केला. त्यात रोज नवी धुणी धुण्याचे काम त्यांनी नित्यनियमाने जारी ठेवले.
परंतु रामशास्त्री असल्याचा आव आणून वानखेडे यांच्यावर आरोप करताना त्यांनी ठोस म्हणावा असा एकही पुरावा दिलेला नाही. केवळ शाब्दिक धुरळा उडवण्याचे काम त्यांनी सातत्याने केला. पत्रकारांच्या साक्षीने एनसीबीची कारवाई चूक की बरोबर? याचा निवाडा देताना त्यांनी मोर्चा अचानक वानखेडे यांच्या कुटुंबियांकडे वळवला. तूर्तास तो क्रांती रेडकर यांच्या बहिणीकडे वळवला आहे. स्कॉटलंड यार्डच्या तोडीचे पोलिस खाते असलेल्या राज्याच्या एका कॅबिनेट मंत्र्याला एखाद्या गुन्हेगाराबद्दल पत्रकार परिषदेत तोंडपाटीलकी करण्याची गरज काय? असेल एखादा दोषी तर पोलिसांना आदेश देऊन, त्याची माहिती काढा, कारवाई करा!
मलिक रोज नवा आपटीबार फोडत असल्यामुळे त्यातली गंमतही आता संपत चालली आहे. न्यायालयाने त्यांना उत्तर द्यायला सांगताना ज्याप्रकारे उपहासात्मक भाषेचा प्रयोग केला आहे ती फक्त झलक आहे. पिक्चर अभी बाकी है, अजून ट्रेलरही पुरता दिसलेला नाही.
केंद्रीय मागासवर्गीय आयोगाने ‘समीर वानखेडे हे मागासवर्गीयच आहेत’, असा निर्वाळा देऊन आधीच मलिक यांच्या आरोपातील हवा काढली आहे. त्यामुळे याच मुद्यावरून वानखेडे यांच्या वडिलांवर केलेली चिखलफेक न्यायालयात सिद्ध करणे मलिकांना जड जाणार आहे.
हे ही वाचा:
नवाब मलिकांना न्यायालयाने झापले; ट्विटरवर उत्तरे देता, इथेही द्या!
‘एसटीला भगवा दिला, पण कर्मचारी नागवा झाला’
हिंदू पलायन झालेल्या कैरानामध्ये योगी
देशातील सर्वात मोठ्या IPO आधी मालक थेट तिरुपतीच्या दरबारात
वानखेडे यांच्या पहिल्या पत्नीचे वडील, त्यांचा इस्लामी पद्धतीने निकाह लावणारा मौलवी हे न्यायालयात साक्ष द्यायला जातील का? गेले तरी त्याला कायद्याच्या भाषेत किंमत किती असेल?
मलिक विरुद्ध वानखेडे प्रकरणाचा पुढचा अध्याय आता न्यायालयात पाहायला मिळेल. तिथे फक्त शब्दांची धुळवड चालत नाही, पुरावे लागतात. तिथे सामना माना डोलावणाऱ्या पत्रकारांशी नसून कायद्यावर बोट ठेवणाऱ्या कायदेतज्ज्ञांशी होतो. तिथे जळजळ, आकस आणि खुन्नस या भांडवलावर लढता येत नाही, तिथे ढाली आणि तलवारीही कायद्याच्याच असतात. नवाबशास्त्री प्रभूणे आपल्या पुराव्यांना व्यवस्थित धार काढून न्यायालयासमोर सादर करतील अशी अपेक्षा आहे.
(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)