राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांना ईडीने अटक केल्यानंतर आता नवाब मलिक यांचा मुलगा फराझ मलिक यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. ईडीकडून लवकरच नवाब मलिक यांचा मुलगा फराझ मलिक यांना समन्स जाण्याची शक्यता आता वर्तवण्यात येत आहे. फराझ मलिक यांनी कुर्ला जमीन खरेदी प्रकरणात महत्वाची भूमिका बजावली होती, अशी माहिती आता समोर येत आहे.
कुर्ला येथील मोक्याची जागा नवाब मलिक यांनी काही लाख रुपयांना दाऊदच्या संबंधित लोकांकडून खरेदी केली, असा आरोप नवाब मलिक यांच्यावर करण्यात आल्यानंतर तपासासाठी ईडीने नवाब मलिक यांना बुधवारी, २३ फेब्रुवारी रोजी प्रथम चौकशीसाठी नेले आणि नंतर त्यांना अटक करण्यात आली आणि न्यायालयाने त्यांना ३ मार्चपर्यंत ईडी कोठडी सुनावली आहे.
त्यानंतर या व्यवहारात फराझ मलिक यांची महत्त्वाची भूमिका असल्याचे समोर आले आहे त्यामुळे आता त्यांना ईडी समन्स पाठवण्याची शक्यता आहे. फराझ मलिक यांनी स्वतः दक्षिण मुंबईतल्या हसीना पारकरच्या घरी जाऊन त्यावेळी पैसे दिले होते. ५ लाखांचा चेक आणि ५० लाख रुपयांची रोख फराझ मलिक यांनी हसीना पारकरला सोपवली होती. त्यावेळी हसीना पारकरसोबत तिचा निकटवर्तीय सलीम पटेल हाही होता. तसेच फराझ यांच्यासोबत त्यावेळी आणखी दोन माणसे होती. त्यातील एक व्यक्ती नवाब मलिक यांचे भाऊ अस्लम मलिक हे होते.
हे ही वाचा:
श्रीलंकेच्या भारतीय राजदूतांची राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयाला भेट
‘यशवंत जाधवांवर झालेल्या कारवाईचे स्पष्टीकरण पक्षप्रमुखांनी द्यावे’
आयपीएल २०२२चा रणसंग्राम मुंबई, पुण्यात; या तारखेपासून सुरू होणार सामने
युद्धाने कोणतेही प्रश्न सुटू शकत नाहीत; पंतप्रधान मोदींचा पुतीन यांना सल्ला
दुसरीकडे नवाब मलिक हे ईडीच्या कोठडीत चौकशीदरम्यान अजिबात सहकार्य करत नसल्याची माहिती सूत्रांमार्फत समोर आली आहे. ३ मार्च पर्यंत नवाब मलिक हे ईडीच्या कोठडीत असणार आहेत. या संपूर्ण काळात ईडीच्या माध्यमातुन मलिक यांची मनी लॉन्डरिंगच्या प्रकरणात चौकशी होणार आहे.